शेवगाव : शहरात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील ७ जणांचा, तर तालुक्यातील मुंगी येथील रुग्णाच्या संपर्कातील ५ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पार्श्वभूमीवर शेवगाव शहर २७ जुलैपर्यंत दहा दिवसासाठी लॉकडाऊन केले असल्याची माहिती तहसिलदार अर्चना पागिरे यांनी दिली.
शेवगाव तालुक्यातील १९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तालुक्यातील ११३ गावापैकी १० गावात कोरोनाने शिरकाव केला होता. त्यापैकी शेवगाव शहर, मुंगी, निंबेनांदूर वगळता अन्य गावे कोरोना मुक्त झाली आहेत. तालुक्यातील २१ जणांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
शेवगाव शहरातील कोविड केअर सेंटर येथून शनिवारी सकाळी मुंगी येथील कोरोनाबाधित युवकावर यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. शनिवारी सकाळी शहरात ७ रुग्णांची वाढ होताच तहसिलदार अर्चना पागिरे यांनी दहा दिवसांसाठी शहर लॉकडाऊन केले आहे. १८ ते २८ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शहर लॉकडाऊनचा आदेश पागिरे यांनी काढला आहे.