शेवगाव : शेवगाव ते नेवासा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दिवसेंदिवस छोट्या, मोठ्या अपघाताची संख्या वाढत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले असून रोडच्या साईडपट्टया उघड्या पडल्याने रस्त्याच्या कपारीवरुन अवजड वाहने उलटण्याची शक्यता बळावली आहे.
चालकांना खड्यातून मार्ग शोधतांना कसरत करावी लागत असल्याने, प्रवाशी यंत्रणेच्या नावाने लाखोली वाहत आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. याच मार्गावर दहिगावने, भातकुडगाव, भावीनिमगाव, देवटाकळी, शहरटाकळी, जोहारापूर, दाडेगाव, हिंगणगाव, बक्तरपूर, ढोरसडे, मठाचीवाडी, रांजणी आदी गावांतील ग्रामस्थांना जा-ये करावी लागते. या गावांमधील विद्यार्थी याच मार्गाने शाळेत जातात. साखर कारखाना, शाळा, महाविद्यालय, छोटेमोठे उद्योग व्यवसाय, धार्मिक स्थळे, दुग्ध व्यवसाय या परिसरात असल्याने तसेच नेवासा, श्रीरामपूर, संगमनेर, नाशिककडे जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरु असते. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जिवमुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर दीड फूट खोल जीवघेणे मोठाले खड्डे पडले. रस्त्याच्या दुतर्फा झुडपे वाढली आहे. त्यामुळे चालकाला समोरून येणारे वाहन दिसत नाही. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे. गत दहा वर्षापासून या परिसरातील नागरिक रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी करत असून सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधीच्या अनास्थेमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
शेवगाव-नेवासा मार्गावरील कोणत्याही गावातील रुग्णाला शेवगाव येथे नेताना अडचण निर्माण होते. रस्त्याअभावी रात्री-अपरात्री दवाखान्यात जाण्याची वेळ आल्यास रुग्णाचा जीव जाण्याची भीती असते.
.....
तात्पुरती मलमपट्टी
शाखा अभियंता म्हणतात दुरुस्तीचे काम सुरु आहे, मात्र प्रत्यक्षात जेसीबी यंत्राच्या साह्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात बाजूची माती उकरुन टाकण्याचे काम सुरु असून रस्त्याची मलमपट्टी करुन प्रवाशांच्या भावनेशी सार्वजनिक बांधकाम विभाग खेळ खेळत आहे.
--------
सध्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे, डांबराचा तुटवडा असल्याने कामाला उशीर होत आहे.
-दिलीप कोंगे, शाखा अभियंता, शेवगाव.
-- ----
फोटो-१३शेवगाव रोड१, १३शेवगाव रोड २
..
ओळी-शेवगाव ते नेवासा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दिवसेंदिवस छोट्या, मोठ्या अपघाताची संख्या वाढत आहे.