तिसगाव : पाण्याअभावी जळून चाललेल्या खरीप हंगामातील पिकांसह उसाला पाटपाणी मिळावे. मुळा पाटचारीचे आवर्तन सुटून चार दिवस झाले तरी गाव परिसराला पाणी न मिळाल्याने मंगळवारी संतप्त शेतकऱ्यांनी तिसगावजवळील शेवगाव-पैठण राज्यमार्गावरील पाडळी ते दीड तास रास्तारोको आंदोलन केले.पाडळी, चितळी, साकेगाव या तीन गावचे लाभार्थी शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. ज्येष्ठ नेते शेषराव कचरे, युवा नेते बाजीराव गर्जे, सिकंदर शेख, दिलीप कचरे आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. पाण्याअभावी भुईमुग, तूर, मूग पिके जळून गेली आहेत. पाटपाणी मिळाल्यास बाजरी, कडवळ, मका अशी पिके काहीअंशी तरी जगण्याची शक्यता आहे. पाण्याअभावी वाळून चाललेल्या उसाच्या पिकाला दिलासा मिळेल. सकाळी नऊ वाजताच आंदोलन सुरू झाले होते. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त प्रवास करणारे व शाळकरी विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याने काही काळ वाहन कोंडीचे प्रकार झाले. युवा शेतकरी गणेश कचरे, सजन गर्जे, शंकर भिसे, सुधाकर डांगे, भगवान गर्जे आदींनी याप्रसंगी पोटतिडकीने भावना मांडल्या. पाऊस लांबत चालल्याने परिसरातील बळीराजा हवालदिल झाल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर व सहकाºयांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.शुक्रवारी आवर्तन सोडण्याचे आश्वासनपाटपाण्याचे आवर्तन सुटून चार दिवस झाल तरी परिसराला पाणी का मिळत नाही?, असा संतप्त सवाल उपस्थित शेतक-यांनी केला. त्यामुळे पाटबंधारे व महसूल प्रशासनाच्या अधिका-यांना निरूत्तर व्हावे लागले. येत्या शुक्रवारी तीन दिवसांनी पाटपाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार नामदेव पाटील, पाटबंधारे अधिकारी एस. आर. गुंजाळ यांनी संबंधित अधिका-यांशी चर्चा करून दिले. त्यानंतर आंदोलक शेतकरी रस्त्यावरून उठले.