शेवगाव : तालुक्यातील मौजे आखेगाव येथील काटेवाडी वस्तीवर गेल्या दोन महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने त्रस्त असलेल्या महिलांनी शुक्रवारी हंडा मोर्चा नेऊन शेवगाव पंचायत समिती दणाणून सोडली.काटेवाडी वस्तीवरील नंदीवाले तिरमल समाजाच्या महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर पायपीट करावी लागते. गावाला वस्तीजवळून पिण्याचा पाण्याचा पुरवठा होतो. मात्र वस्तीवर जाणीवपूर्वक पाणी पुरवठा होत नसल्याने वस्तीवरील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतो. वस्तीवरील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी भारतीय टायगर फोर्सचे राज्य प्रवक्ते प्रा.किसान चव्हाण, रावसाहेब जाधव, बाळासाहेब आव्हाड, प्रकाश वाघमारे, लक्ष्मण मोरे, बाबासाहेब फुलमाळी, गंगा फुलमाळी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पंचायत समितीत महिलांचा हंडामोर्चा नेण्यात आला. यात डोक्यावर रिकामे हंडे घेऊन वस्तीवरील महिला सहभागी झाल्या होत्या. वस्तीवरील संतप्त नागरिकांनी गटविकास अधिकारी अशोक भवारी यांना काही वेळ घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली.मोर्चेकºयांच्या घोषणांनी शेवगावचे प्रमुख रस्ते व पंचायत समिती परिसर दणाणून गेला. गटविकास अधिकाºयांच्या दालनात जाऊन पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे संबंधिताचे दुर्लक्ष असून आम्ही या आंदोलनाबाबत पाच दिवसांपूर्वी निवेदन दिले. आमच्या निवेदनाची दखल घेणे तर दूर, उलट ग्रामसेवकांनी वस्तीवर येऊन निवेदन कोणी दिले याचा जाब विचारल्याची तक्रार आंदोलकांनी केली. गोविंदा फुलमाळी, अनिता फुलमाळी, सुमन फुलमाळी, सोनाली फुलमाळी, रावसाहेब फुलमाळी, बाळू फुलमाळी, साहेबा फुलमाळी, बाबू फुलमाळी, सुरेखा फुलमाळी, राणी फुलमाळी, उत्तम फुलमाळी, हनुमंता फुलमाळी, प्रतीक्षा फुलमाळी, मालनबाई फुलमाळी, जनाबाई फुलमाळी आदींसह वस्तीवरील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.टाकी असूनही वस्ती पाण्यावाचून कोरडीआमच्या वस्तीवर पाण्याची टाकी आहे. आमच्या वस्तीपासून गावात जाणाºया पाईपलाईन मधून चार ते पाच दिवसांनी पाणी जाते. मात्र आमच्या वस्तीवर मुद्दाम पाणी सोडले जात नाही. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नी ग्रामसेवक निष्काळजीपणा करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मोर्चेकºयांनी केली. यावेळी गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी रविवारी वस्तीवर येऊन पाणी प्रश्नाबाबत निर्णायक तोडगा काढण्यात येईल. यापुढे पिण्याच्या पाण्याबाबत वस्तीवर अन्याय होणार नाही, प्रसंगी कुचराई करणाºयांवर कारवाई करण्यात येईल, असे गटविकास अधिका-यांनी जाहीर केल्यानंतर पुकारण्यात आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.