शेवगाव (जि. अहमदनगर) : गेवराईकडे प्रवशी घेऊन निघालेल्या एसटी बसला चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करतांना डबल ट्रॉली ट्रॅक्टरने कट मारल्याने बसचे नुकसान झाले आहे. सदर प्रकरणात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांचा तक्रार अर्ज घेण्यात पोलिसांनी टाळाटाळ केल्याने, संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत संप पुकारला आहे.
फिर्याद घेण्यास शेवगाव पोलिसांनी टाळाटाळ केल्याच्या निषेधार्थ रात्री बारा वाजेपासून शेवगाव आगारातील चालक-वाहकांनी शेवगाव बस आगार बंद केला आहे. याबाबत माहिती अशी की, काल मंगळवारी शेवगाव आगाराची शेवगाव-गेवराई बस क्रमांक एमएच १४ बीटी ११५५ चापडगाव येथे आरोग्य केंद्राजवळ प्रवाशी उतरवण्यासाठी थांबलेली असताना, चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणाऱ्या डबल ट्रॉली जोडलेल्या ट्रॅक्टरचा कट एसटी बसला लागला. ट्रॉलीच्या हेलकाव्यात बसच्या डाव्या बाजूचा आरसा फुटून नुकसान झाले.
याबाबत चालकाने शेवगाव पोलीस ठाण्यात संबंधित ट्रॅक्टर चालकांवर अपघाताचा गुन्हा दाखल करावा म्हणून तक्रार अर्ज दिला होता. मात्र पोलिसांनी तक्रार अर्ज नाकारत गुन्हा दाखल करुन घेतला नाही. अशी माहिती एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी दिलीप लबडे यांनी दिली आहे. रात्री उशिरा पर्यंत आगाराचे कर्मचारी गुन्हा दाखल करावा अथवा तक्रार अर्ज तरी घ्यावा म्हणून शेवगाव पोलीस ठाण्यात थांबले होते. मात्र पोलिसांनी याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने याचा निषेध म्हणून शेवगाव आगाराच्या चालक-वाहकांनी रात्री पासून एसटी बस आगार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे लबडे यांनी सांगितले.
एसटी बसला डॅश मारणारा ट्रॅक्टर हा शेवगाव तालुक्यातील एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाचा असल्याची चर्चा असून त्यामुळे पोलिसांनी राजकीय दाबावातून ट्रॅक्टर चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल न केल्याची चर्चा आहे. दुपारपर्यंत तक्रार अर्ज दाखल करून घेण्यास पोलीस अनुकूल होते. मात्र नंतर सूत्रे फिरली आणि पोलिसांनी तक्रार अर्ज नाकारत गुन्हा दाखल केला नाही अशी चर्चा सुरु आहे.
राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी दिवाळी पासून राज्यातील बहुतांशी एसटी कर्मचारी बेमुदत संपावर असल्याने बस सेवा ठप्प झाली आहे. अशात शेवगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत कामावर रुजू झाले. चालक-वाहक कामावर हजर झाल्याने तुरळक बस सेवा सुरू असल्याने प्रवाशांना आधार मिळाला आहे. यापूर्वी अनेक घटनामध्ये शेवगाव पोलिसांनी फिर्याद दाखल करुन घेण्यात टाळाटाळ करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. तसंच यात अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेशही असल्याचं म्हटलं जातंय.
शेवगाव आगारातील वाहक-चालक जीव धोक्यात टाकून प्रवाशांना सेवा देत असताना पोलिसांचे सहकार्य अपेक्षित आहे. जो पर्यंत ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल होणार नाही तो पर्यंत शेवगाव बस आगार शंभर टक्के बंद ठेवण्यात येणार आहे.दिलीप लबडे, कामगार नेते.