दहिगावने : मूळ शेवगावच्या मात्र सध्या सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक असलेल्या तेजस्वी सातपुते यांचा रविवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते दिल्लीत सन्मान झाला. कोरोनाकाळात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाकडून ‘कोविड वॉरियर वुमन द रियल हिरोज’ पुरस्कार सातपुते यांना प्रदान करण्यात आला.
सोलापूर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सातपुते यांनी पोलीस ठाण्यांची स्वच्छता, परिसरात वृक्षारोपण, पोलीस कर्मचाऱ्यांचा सकस आहार, नियमित व्यायाम व योग यासाठी विशेष मार्गदर्शन केले. ऑनलाईन सेमिनारच्या माध्यमातून कोरोनाविषयी जनजागृती निर्माण केली होती. सोलापूरच्या अगोदर सातारा येथे पोलीस अधीक्षक पदावर काम करताना कोरोना उपचारासाठी पोलीस दलासाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू केले होते. गरजू लोकांना सर्वोतोपरी मदतीसाठी प्रयत्न केले होते. त्याची दखल घेत सातपुते यांचा हा सन्मान झाला.
----
मला मिळालेला पुरस्कार हा माझ्या एकटीचा नसून राज्यातील सर्व पोलीस दलाने केलेल्या कार्याचा सन्मान आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोनाकाळात जीवाची पर्वा न करता कठोर परिश्रम घेतले. त्यामुळे हा पुरस्कार मिळाला, असे मी समजते.
-तेजस्वी सातपुते,
पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
फोटो ०१ तेजस्वी सातपुते
शेवगावच्या कन्या व सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना राष्ट्रीय महिला आयोगाकडून दिला जाणारा ‘कोविड वॉरियर वुमन द रियल हिरोज’ पुरस्कार दिल्ली येथे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.