खर्डा : जामखेड तालुक्यात सर्वात मोठी व राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेली खर्डा ग्रामपंचायत आपल्याच गटाच्या ताब्यात याव्यात यासाठी आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे दोघेही मैदानात उतरले आहेत. यावेळी माजी सरपंचासह काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
सतरा सदस्य संख्या असलेल्या खर्डा ग्रामपंचायतीमध्ये भाजप पुरस्कृत जनसेवा पॅनलचे दोन उमेदवार आधीच बिनविरोध झाले आहेत.
महाविकास आघाडी पुरस्कृत खर्डा ग्रामविकास आघाडी व भाजपच्या जनसेवा पॅनलमध्ये प्रामुख्याने लढत होत आहे. भाजप पुरस्कृत जनसेवा पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे तर खर्डा ग्राम विकास आघाडी पॅनलच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार मैदानात उतरले आहेत.
राम शिंदे यांनी गावात प्रचार रॅली काढून ग्रामस्थांशी संपर्क साधला. या रॅलीनंतर नामदेव मंदिर येथे झालेल्या घोंगडी बैठकीत त्यांनी उमेदवारांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शिंदे म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदारांना हूल बसली. विरोधकांनी हूल देऊन मतदान घेतले. दीड वर्षात प्रचिती आली आहे. या प्रचीतीच्या माध्यमातून आता ग्रामपंचायत निवडणुकीत जनता भाजनच्या नेतृत्वला पुन्हा संधी देईल, असा विश्वास व्यक्त केला. कााही ग्रामपंचायती बळजबरीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तर तो प्रयत्न मतदार सफल होऊ देणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
रोहित पवार यांनीही गावात शहरात रॅली काढून मतदारांशी संपर्क साधला. खर्डा बसस्थानक परिसरात झालेल्या प्रचार सभेत पवार म्हणाले, ही निवडणूक भाजपच्या अस्तित्वाची लढाई आहे तर महाविकास आघाडीची विकासाची लढाई आहे. सदस्यांवर किंवा जनतेवर कोणी दबाव टाकत असेल तर ते योग्य नाही. लोकशाही टिकली पाहिजे. लोकशाहीमध्ये कोणी दहशतीचे वातावरण करत असेल, तर दडपशाही खाली जाऊ नका. मी त्याचा प्रशासकीय मार्गाने बंदोबस्त करतो, असे पवार यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच शिवकुमार गुळवे, ग्रामपंचायत सदस्य एजाज झिक्रे, विकास शिंदे, प्रदीप ढगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विजयसिंह गोलेकर, सूत्रसंचालन दत्तराज पवार यांनी केले. माजी सरपंच मंजर सय्यद यांनी आभार मानले.