शिर्डी : शिर्डीचे पोलीस उपअधिक्षक अभिजीत शिवथरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांशी दोन तरुणांनी वाद घालत मारहाण केली. यामध्ये शिवथरे यांच्या बोटाला जखम झाली आहे.शिवथरे यांचे अंगरक्षक अविनाश बनजगोळकर यांच्या फिर्यादीवरून शिर्डीतील यश अनिल ओस्तवाल व आदीत्य दिलीप ओस्तवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे़नववर्षाच्या मध्यरात्री मंदिर परीसरात लावण्यात आलेला बंदोबस्त तपासणी करता उपअधिक्षक अभिजीत शिवथरे यांच्यासह फिरत होतो़ यावेळी सोबत बॉम्ब शोधक पथकाचे सहाय्यक फौजदार संदीप कोष्टी, अरुण ससाणे, प्रकाश साळवे, प्रताप डोळसे, जयसिंग ठोकळ हे सुद्धा होते़ मुखदर्शन गेटजवळ गर्दी झालेली होती़ काहीजण बाहेर पडण्याच्या गेट मधून आत जाण्याचा प्रयत्न करत होते़ त्यामुळे तेथे गोंधळ झाल्याने मी तेथे गेलो़ दोन इसमांनी कामात अडथळा आणून हुज्जत व झटापट करण्यास सुरूवात केली़ त्याचवेळी बाजुलाच असलेले अभिजीत शिवथरे व बाँम्ब शोध पथकाचे कर्मचारी तेथे आले़ त्या इसमांना अभिजीत शिवथरे समजावून सांगत असतांना त्यांचे देखील न ऐकता त्यांनी त्यांच्याशीही हुज्जत घातली. त्यात शिवथरे यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्यास दुखापत झाली़ त्यानंतर सौम्य बळाचा वापर करून यश ओस्तवाल यास पकडण्यात आले तर पळुन गेलेल्या आदीत्य ओस्तवाल यास नंतर ताब्यात घेण्यात आल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
शिर्डीत उपअधीक्षकांना मारहाण : दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 6:13 PM