शिर्डी : साईबाबांनी आपल्या हयातीत आपले नाव, गाव, जात, धर्म उघड केला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र साईबाबांच्या जन्मस्थळ असलेल्या परभणी जिल्ह्यातील पाथरीचा विकास करणार असल्याचे सांगून शिर्डीकर व भाविकांची नाराजी ओढवून घेतली आहे.साईसमाधी शताब्दी सोहळ्यात राष्ट्रपतींनी साईबाबांच्या जन्मस्थानाचा उल्लेख केला होता. यावर साईभक्त व शिर्डीकरांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, कमलाकर कोते यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिर्डीकरांनी दिल्लीत जाऊन थेट राष्ट्रपतींची भेट घेऊन जन्मस्थानाचा खुलासा केला होता. आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी जन्मस्थानाचा उल्लेख केल्याने पुन्हा भाविक व शिर्डीकरांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.साईबाबांबद्दल अधिकृत डॉक्युमेंट म्हणून साईसतचरित्र हेच आहे. साईसतचरित्रात कुठेही साईबाबांच्या जन्म व जन्मस्थळाचा उल्लेख नाही. ज्या बाबी ज्ञात नाहीत त्या अज्ञात आहेत. त्याबद्दल अधिकृत बोलणे कठीण वाटते, असे साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावर यांनी सांगितले.पाथरीच्या विकासाला मदत करण्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र पाथरी या गावाचा साईबाबांचे जन्मस्थान असा उल्लेख करण्याला साईभक्त आणी शिर्डीकरांचा आक्षेप आहे. साईबाबांनी आपला जन्म, गाव, जात, धर्म याबद्दल कधीच कोणाला सांगितले नाही. यामुळेच बाबांची प्रतिमा सर्वधर्म समभावाची आहे. अलीकडच्या काळात जाणीवपूर्वक साईबाबांच्याच विचाराला नख लावण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे देश विदेशातील करोडो साईभक्तांच्या भावना दुखावल्या जात आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे साईबाबांचे निस्सीम भक्त असल्याने त्यांनी ग्रामस्थ व साईभक्तांच्या भावना समजावून घ्याव्यात, असे माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी सांगितले.
शिर्डी-पाथरीच्या विकासाला साईभक्त अथवा शिर्डीच्या ग्रामस्थांचा विरोध नाही. मात्र पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ असल्याबद्दल जो उल्लेख केला गेला. त्याला आमचा विरोध आहे. याबाबत लवकरच शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबर बैठक घडवून आणणार आहे, असे शिवसेना नेते कमलाकर कोते यांनी सांगितले.