शिर्डी : विमानतळाच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या मुहुर्तावर सोमवारी दिल्ली-शिर्डी विमानसेवा सुरू झाली़ दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास स्पाईस जेटचे ८०० हे बोर्इंग विमान १३३ प्रवाशांना घेऊन शिर्डीच्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. विमानातून उतरताच प्रवाशांनी अत्यानंदाने साईनामाचा गजर केला.संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांच्या हस्ते केक कापून विमानतळाचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला़ रूबल अग्रवाल, विमानतळ कंपनीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सी़एसग़ुप्ता व विमानतळ संचालक धिरेन भोसले यांनी दिल्लीहून आलेल्या भाविकांचे स्वागत केले़ गेल्या वर्षी साईसमाधी शताब्दीच्या शुभारंभाचे औचित्य साधून या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले होते़ त्यानंतर येथून हैद्राबाद व मुंबईसाठी विमानसेवा सुरू होती़ या सेवेला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला़ वर्षभरात या दोन्ही ठिकाणांसाठी १५०० उड्डाणे झाली. तब्बल सत्तर हजार प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला़ दिल्लीहून शिर्डीला येण्यासाठी १३३ तर शिर्डीतून दिल्लीला जाण्यासाठी पहिल्याच दिवशी १२० प्रवाशांनी आगावू तिकिटे बुक केले होते. हे विमान रोज दिल्लीहून १२़३५ वाजता निघून २़३५ वाजता शिर्डीत पोहोचेल़ दुपारी तीन वाजता शिर्डीतून निघून पाच वाजता दिल्लीत पोहोचेल़२८ तारखेपासून स्पाईस जेटची बंगळूर-शिर्डी-मुंबई-शिर्डी-बंगळूर व हैद्राबाद-शिर्डी, चेन्नई-हैद्राबाद विमानसेवा सुरू होणार आहे. याशिवाय दिल्लीहून जेट एयरवेजने २८ डिसेंबरपासून विमानसेवा सुरू करण्याचे शेड्यूल्ड कंपनीनी दिले आहे. यानंतर इंदौर-शिर्डी, अहमदाबाद-शिर्डी ही दररोजची विमानसेवा असणार आहे.सध्या २५०० मीटर धावपट्टी आहे. ती ३५०० मीटर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे़ यानंतर नाईट लॅँडीगची सुविधाही उपलब्ध होणार आहे़ देशांतर्गत विमानतळासाठीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत़ नवीन एटीसी टॉवरच्या निविदाही काढल्या आहेत़ लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टर्मीनल इमारतीचे काम हाती घेण्यात येईल़ पुढील काही महिन्यात विमानतळ आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी सज्ज असेल़ -अनिल पाटील, उपाध्यक्ष, विमानतळ विकास कंपनी, शिर्डी.
शिर्डी विमानतळावर उतरले बोर्इंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 12:59 PM