लोकमत न्यूज नेटवर्क
राहाता : शिर्डी विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यातच नव्हेतर, महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदार संघामध्ये विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आघाडीवर असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राहाता तालुका कृषि आणि महसूल विभागाच्यावतीने शासनाच्या विविध योजनांचे प्रमाणपत्र, अनुदान वाटप आणि मोफत अपघात विमा योजनेतील पात्र लाभाथर््यांना धनादेशाचे वितरण आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती हिराबाई कातोरे होत्या.
संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष साहेबराव निधाने, तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, पोपटराव लाटे, बापूसाहेब आहेर, मुकूंदराव सदाफळ, प्रतापराव जगताप, बाबासाहेब म्हस्के, कैलास तांबे, नंदुशेठ राठी, प्रांताधिकारी रविंद्र ठाकरे, उपविभागीय कृषि आधिकारी बाळासाहेब मुसमाडे, तहसिलदार माणिकराव आहेर आदि याप्रसंगी उपस्थित होते. शासकीय योजनेचा लाभ सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचला पाहिजे. गेली अनेकवर्षे हा प्रयत्न सातत्याने सुरु राहील्यामुळे ११ हजारांपेक्षा अधिक लाभार्थी विविध योजनांमध्ये पात्र ठरल्यामुळे दर महीन्याला ६५ लाखरुपयांचे अनुदान या कुटूंबापर्यंत पोहचत असल्याचे विखे यांनी म्हटले. मोफत अपघात विमा योजना सुरु करणारा शिर्डी मतदार संघ देशात एकमेव आहे. १ लाख ३७ हजार नागरीकांनी या योजनेत सहभाग घेतला. या योजनेचा हप्ता जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून भरला जातो. आजपर्यंत ५६ लोकांना १ कोटी रुपयांची मदत या विमा योजनेतून झाली आहे. सर्वाधिक शिक्षण घेणा-या विद्याथीर्नींची संख्याही शिर्डी मतदार संघात आहे.
संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष साहेबराव निधाने म्हणाले, वंचित घटकांना या योजनांच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम समितीच्या माध्यमातून केले जाते. प्रारंभी ना.विखे पाटील यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, कृषि विभागाच्या विविध योजनांचे अनुदान आणि अपघातात मृत पावलेल्या व्यक्तिंच्या वारसांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास महसूल आणि कृषि विभागाचे आधिकारी, कर्मचारी, शेतकरी आणि योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायब तहसिलदार राहुल कोताडे यांनी आभार मानले.