शिर्डी : नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी सोमवारी तिघांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत अनपेक्षितपणे चुरस निर्माण झाली आहे़ विशेष म्हणजे तिघेही विखेंचे कट्टर समर्थक आहेत़नगराध्यक्ष पदासाठी सोमवारपासून निवड प्रक्रिया सुरू झाली़ सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत जगन्नाथ सूर्यभान गोंदकर, अभय दत्तात्रय शेळके व अर्चना उत्तम कोते यांनी उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी सतिष दिघे यांच्याकडे दाखल केले़ जगन्नाथ गोंदकर यांनी दोन अर्ज दाखल केले होते़ मात्र दोन अर्ज असल्याने एक अर्ज बाद ठरवण्यात आला़ अर्ज माघारीसाठी २७ जून रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत मुदत आहे़अर्चना कोते यांच्या अर्जावर गटनेते बाबासाहेब गोंदकर यांची सूचक तर संगीता अनिल शेजवळ यांची अनुमोदक म्हणून स्वाक्षरी आहे़ डॉ़ सुजय विखे हे अर्चना कोते यांच्या नावासाठी अनुकूल आहेत़ याशिवाय अभय शेळके पाटील यांच्या अर्जावर विद्यमान नगराध्यक्षा योगिता शेळके व अनुमोदक म्हणून कविता सुनील निकम तर जगन्नाथ गोंदकर यांच्या अर्जावर मंगेश त्रिभुवन यांनी सूचक म्हणून तर छाया पोपट शिंदे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे़नगरपंचायतमध्ये विखे गटाचे दहा, भाजपाचे तीन, शिवसेना एक, मनसे एक व दोन अपक्ष नगरसेवक आहेत़ गेली अडीच वर्षे अपक्ष व मनसेसह विखे गटाकडे तेरा नगरसेवक होते़ आता अडीच वर्षासाठी इतर मागास प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद राखीव असल्याने विखे समर्थक असलेले तिघेजण नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत उतरले आहेत़स्पर्धेतील दोघांची मने वळवण्यात विखेंना यश आले तर निवडणूक बिनविरोध होऊ शकेल़ खासदार डॉ़ सुजय विखे यांनी त्यांच्याशी संवादही साधला आहे़ मात्र त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही़
शिर्डी नगरपंचायत : नगराध्यक्षपदासाठी विखे समर्थकांचे तीन अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 3:58 PM