राहुरी : ११ मार्चपासून सुरू झालेल्या शिर्डी - दादर एक्स्प्रेसला राहुरीत थांबा न दिल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. तरी या रेल्वेला राहुरी येेथे थांबा द्यावा, अशी मागणी प्रवासी संघटनेतर्फे होत आहे.
शिर्डी - दादर एक्स्प्रेस आठवड्यातून रविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार या चार दिवशी शिर्डीवरून ही रेल्वे रात्री १० वाजता सुटते, तर सकाळी ६.३५ ला दादरला पोहोचते. परतीच्या प्रवासात मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार दादरहून रात्री ११.४५ला सुटते. परंतु या रेल्वेला राहुरी स्टेशनला थांबा देण्यात आलेला नाही.
राहुरी हे तालुक्याचे ठिकाण आहे. जवळच महाराष्ट्रातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ, सहकारी कारखाने, मोठी व्यापारीपेठ आहे. जागतिक किर्तीचे शनि शिंगणापूर हे धार्मिक स्थळ राहुरीच्या जवळ आहे. रेल्वे विभागाने या रेल्वेला थांबा देण्यासाठी दुर्लक्ष केलेले आहे. यामुळे परिसरातील प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
रेल्वे प्रशासनाने सुरक्षित प्रवासासाठी लोकांकडून होणाऱ्या या मागणीचा विचार करावा, अशी मागणी राहुरी तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष इंद्रभान पेरणे, सचिव मंगल जैन, विद्यामंदिर पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब मोरे, तालुका शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय गिरी, पारस जैन यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे.
...
आंदोलनाची वेळ आणू देऊ नका
राहुरीला थांबा मिळविण्यासाठी प्रवाशाना यापूर्वीही मोठे आंदोलन करावे लागले होते. यावेळेसदेखील प्रवाशांना आंदोलन करण्याची वेळ रेल्वे प्रशासनाने आणू नये. या गाडीला राहुरी या ठिकाणी त्वरित थांबा मंजूर करावा, अशी मागणी परिसरातील प्रवाशांकडून होत आहे.
...