शिर्डी- नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि मुख्य लिपिकला मारहाण केल्याप्रकरणी आज नगरपंचायतीच्या कामगारांनी काम बंद आंदोलन केले आहे. यामुळे पाणीपुरवठा स्वच्छता यासारख्या महत्त्वाच्या सेवा बंद पडल्याने साईनगरी ठप्प झाली आहे.यामुळे स्थानिक नागरिकांबरोबरच भाविकांचे हाल होत आहेत. पालखी रस्ता ते पिंपळवाडी रस्ता यामधील नऊ मीटरचा रस्ता भूसंपादन करून नगरपंचायतकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते.
न्यायालयाने नगरपालिका व भूसंपादन कारवाई योग्य असल्याबद्दलचा निर्वाळा दिला होता. तरीही अन्याय झाल्याबद्दल काही आदिवासी समाजातील नागरिकांनी याचिका दाखल केली होती नंतर ती मागे घेण्यात आली. त्यानंतर नगरपंचायत निविदा प्रक्रिया करून सदर रस्त्याचे काम सुरू केले होते. तरीदेखील सदरच्या व्यक्ती वारंवार कामात अडथळे आणत होते. त्यांनी अन्याय झाल्याच्या भावनेतून उपोषण केले होते तसेच आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. काल मुख्याधिकारी सतीश दिघे व मुख्य लिपिक मुरलीधर देसले कामाची पाहणी करत असताना या ठिकाणी या समाजातील काही तरुणांनी व महिलांनी मुख्याधिकारी दिघे यांना शिवीगाळ करून देसले यांना मारहाण केली.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन काही आरोपीना पकडले तर काही पळून गेले. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणण्याबरोबरच आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे देसले यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केले आहे घटनेतील काही तरुणांना व महिलांना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपींना अटक करून कठोर शासन करावे यासाठी हे आंदोलन सुरू आहे. सकाळपासून सर्व सेवा बंद ठेवून कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत,अशा प्रकारा मुळे सर्व विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची होऊन त्याचा विकास कामांवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी व्यक्त केली आहे