लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणा-या साईबाबांचा प्रसार जगभरात आहे. प्रत्येकाच्या मनामनात साई विसावले आहेत. महाराष्ट्राच्या अध्यात्म भूमीत शिर्डीला महत्वाचे स्थान आहे. साईबाबांनी शिर्डीला कर्मभूमी बनवून देवत्व प्राप्त केले. साईबाबांच्या समाधी शताब्दी सोहळ्यास या पवित्र भूमीत येण्याचे भाग्य मला मिळाल्याने मी कृतज्ञ झालो, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.साई समाधी शताब्दी सोहळा व विमानतळाचा शुभारंभ रविवारी राष्ट्रपतींच्या हस्ते झाला. राज्यपाल डॉ.सी.विद्यासागर राव, सविता कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागरी विमान वाहतूक मंत्री पी अशोक गजपती राजू, पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, खासदार दिलीप गांधी, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार स्रेहलता कोल्हे आदी उपस्थित होते.राष्ट्रपती कोविंद पुढे म्हणाले, साईबाबांचे अंतिम क्षण या भूमीत गेल्याने हे स्थान पवित्र झाले आहे. त्याला साईबाबांनी कर्म व पुण्यभूमी बनवून देवत्व प्राप्त केले. शिर्डीचे हे पवित्र स्थान राज्यातील अध्यात्माला चालना देते. आस्था व विश्वासाच्या देशात साईबाबांनी सर्व वर्गाला शिकवण दिली. कणाकणांत साईबाबा वसल्याने साईधाम साईमय झाला आहे. संपूर्ण देशभरात साईबाबांची आराधना केली जाते. अमेरिका, कॅनडा, सिंगापूर आदी देशांसह जगभरात साई मंदिरे उभारली गेली आहेत. साईबाबांच्या तत्वानुसार आपण सर्वांनी तन, मन व धनाने स्वच्छ चारित्र्य ठेवावे. साई संस्थानच्या कार्यात राज्य सरकारची जबाबदारी महत्वपूर्ण आहे. देशात धर्म, मोक्षासह अर्थकारणालाही महत्व आहे. शिर्डी विमानतळामुळे साईभक्तांची असुविधा दूर होईल. परिसर विकासाबरोबर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. हवाई वाहतुकीने उद्योग-व्यवसाय वृध्दिंगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारा मिनिटाच्या भाषणात राष्ट्रपतींनी त्यांच्यामुळे साईभक्तांची गैरसोय झाल्याबद्दल खेद व्यक्त केला. शिर्डीत साईबाबांचे मंदिर आहे. मूर्ती व समाधी आहे. पण, पाथरी (जि.परभणी) या साईबाबांच्या जन्मस्थानाच्या विकासाकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ३ हजार २०० कोटींचा साई समाधी शताब्दी आराखडा राज्य सरकारने तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात ८०० कोटी रूपये दिले जातील. सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या साई मंदिरात जात, धर्म, पंथ बघितला जात नाही. त्यामुळे वादाचा प्रश्न येत नाही. साईबाबांची शिकवण, विचार राज्य सरकार व संस्थान शताब्दीनिमित्त जगभर पोहचवेल. आपल्या धर्मात मंदिरांचे स्थान मोठे आहे. मंदिरे हे केवळ कर्मकांडाचे ठिकाण न राहता समाज सुधारण्याचे माध्यम व्हावे तरच सर्वसामान्य, गरिबांच्या जीवनात परिवर्तन होईल, असे ते म्हणाले.राष्ट्रपतींच्या हस्ते साई संस्थानचे ‘आयएसओ’ प्रमाणपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे व उपकार्यकारी अधिकारी डॉ.संदीप आहेर यांना प्रदान करण्यात आले. प्रास्ताविकात संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी जगभरातील साई भक्तांना शताब्दी वर्षात शिर्डीला येण्याचे निमंत्रण दिले. स्वागत उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी केले. मुख्यकार्यकारी अधिकारी अग्रवाल यांनी आभार मानले.डिसेंबर महिन्यापर्यंत ‘नाईट लँडींग’-मुख्यमंत्रीविमानतळ धावपट्टीच्या वाढीनंतर आंतरराष्ट्रय उड्डाणे सुरू होतील. १० विमान कंपन्या शिर्डीतून सेवा देण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. या विमानतळाचा उपयोग केवळ भाविकांनाच नव्हे तर शेतकरी, व्यावसायिकांना चालना देण्यास होईल. त्यातून रोजगार उपलब्ध होईल. डिसेंबर महिन्यापर्यंत ‘नाईट लँडींग’ सुरू होईल, असे फडणवीस यांनी जाहीर केले.
महाराष्ट्राच्या अध्यात्मात शिर्डीचे स्थान महत्वपूर्ण : राष्ट्रपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 3:59 PM