प्रमोद आहेर । लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : ब्रिटिश सरकारने कॉलराची साथ पसरू नये यासाठी १९४१ साली शिर्डीतील रामनवमी उत्सवाला येण्यासाठी भाविकांवर बंदी घातली होती़ कॉलराचा फैलाव होऊ नये म्हणून ७९ वर्षापूर्वी ब्रिटिशांनी धार्मिक भावनांचा विचार न करता यात्रेवर बंदी आणली होती. या घटनेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उजाळा मिळाला आहे़ १९४१ साली ५ ते ७ एप्रिल रामनवमी यात्रा होती़ यावेळी शिर्डीसह आसपासच्या गावात कॉलराची साथ असल्याने सरकारने यात्रा बंद ठेवण्याचा हुकूम काढला़ कुस्त्यांचा हंगामा, शोभेची दारू फोडणे यासह गर्दी होईल व रोगाचा फैलाव होईल असे सर्व कार्यक्रम बंद ठेवण्यात आले होते. यात्रेत एकही दुकान येऊ दिले नाही. कोपरगावला गोदावरीचे पाणीही दूषित असल्याने कावड मिरवणूकही बंद ठेवण्यात आली होती. ४ एप्रिलनंतर आलेल्या भाविकांना पोलिसांनी शिर्डीत प्रवेश दिला नाही़ दूरदूरून आलेले लोक पोलिसांच्या हुकुमाने परत गेले़ जे लोक यात्रेच्या अगोदर आले होते त्यांना कॉलराचे इंजेक्शन दिले गेले. त्यांना १३ एप्रिल पर्यंत शिर्डीत ठेवून घेतले़ दर्शनाला तरी परवानगी द्यावी, म्हणून तात्या कोते व सुखटणकर हे नगरला जाऊन जिल्हाधिकारी बहादूर यांना भेटले. पाच ताराही केल्या. पण उपयोग झाला नाही़उत्सवात कीर्तन, भजन, अभिषेक कार्यक्रम अल्प प्रमाणात करण्यात आले़ पाच दिवसांचा उत्सव होता. सरकारच्या हुकूमाने तीन दिवसांचा रद्द झाला. उर्वरित दोन दिवस सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सरकारच्या हुकुमाला अनुसरून बंद करावे लागले़ उत्सवात स्थानिकांना भोजनाऐवजी कोरडा शिधा देण्यात आला़ याच पार्श्वभूमीवर शिर्डीला येतांना भाविकांनी मच्छरदाणी आणण्याचे आवाहन २३ जून १९४१ रोजी संस्थानकडून करण्यात आले होते़ शिर्डी गॅझेटिअरमध्ये याबाबत सविस्तर नोंदी आहेत़
ब्रिटिशांनीही आणली होती शिर्डीच्या रामनवमी उत्सवावर बंदी, ७९ वर्षांपूर्वीचा निर्णय : १९४१ला आली होती कॉलराची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:31 PM