मुंबई - श्रीगोंदा ते कोपर्डी बस सेवा सुरुच राहणार असून सोमवार पासून नव्या मार्गाने राज्य परिवहन विभागाची बस धावेल असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले. कोपर्डीच्या निकालानंतर श्रीगोंदा ते कोपर्डी बस सेवा बंद झाल्याची बातमी प्रसिद्धी माध्यमातून दाखवण्यात आली होती. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्वतः श्रीगोंदाच्या आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधला. याविषयीची वस्तुस्थिती सांगताना विजया रहाटकर म्हणाल्या कि, बस सेवा बंद करण्यात आल्याच्या वृत्तात तथ्य नाही.
परिवहन विभागाच्या तांत्रिक अडचणींमुळे काही दिवस बस बंद होती. मात्र सोमवारपासून नव्या मार्गाने बस पुन्हा सुरु होणार आहे. सकाळी ८. ३० वा कर्जत येथून बस सुटेल. बिटकेवाडी - शिंदा - कोपर्डी - कुळधरण या मार्गाने बस जाईल. कोपर्डी प्रमाणेच शिंदा गावातूनही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनी शाळेसाठी बस प्रवास करतात.
कुठल्याही परिस्थितीत मुलींच्या शिक्षणात अडथळा येऊ देणार नाही असे विजया रहाटकर यावेळी म्हणाल्या. गेल्यावर्षी कोपर्डीची घटना घडल्यानंतर यामार्गावर बस सेवा सुरु व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पाठपुरावा केला होता.