आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवप्रसाद उबाळे यांनी, तर उपसरपंचपदी अनुराधा ठवाळ यांनी अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. मतदारांनी त्रिशंकू कौल दिल्यामुळे सदस्यांच्या फोडाफोडी आणि पळवापळवीमुळे पदाधिकारी निवडीची तालुक्यात उत्सुकता होती.
माजी आमदार राहुल जगताप यांचे कट्टर समर्थक असलेल्या उबाळे यांची सरपंचपदी निवड झाल्यामुळे आढळगावची ग्रामपंचायत आमदार बबनराव पाचपुते यांच्या हातातून निसटली.
ग्रामपंचायतीच्या तेरा जागांसाठी निवडणूक झाल्यानंतर उत्तम राऊत यांच्या गटाला सहा जागा, शिवप्रसाद उबाळे यांच्या गटाला चार जागा, अनिल ठवाळ यांच्या गटाला दोन जागा, तर देवराव वाकडे यांच्या गटाला अवघी एक जागा असा त्रिशंकू कौल मतदारांनी दिला होता.
सदस्यांची फोडाफोडी करणाऱ्यालाच सत्ता मिळणार अशी चर्चा असतानाच उबाळे यांनी सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत होण्यापूर्वीच आपले समर्थक सदस्य सहलीला रवाना केले. उत्तम राऊत यांच्या गटाचा एक सदस्य आणि अनिल ठवाळ गटाचा एक सदस्य फोडून सहा सदस्य जुळविले. तसेच उबाळे यांनी विशेष कौशल्य वापरत देवराव वाकडे यांची साथ मिळविली.
बहुमताला आवश्यक असलेले सात सदस्यांचे संख्याबळ जुळविल्यानंतर पदाचे दावेदार वाढल्यामुळे पुन्हा फाटाफूट झाली. त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ गटाचा उपसरपंचपद देण्याचा शब्द देऊन पाठिंबा मिळवत सत्तेची गणिते जुळविली. सरपंचपदासाठी शिवप्रसाद उबाळे आणि उत्तम राऊत, तर उपसरपंचपदासाठी अनुराधा ठवाळ आणि अंजली चव्हाण यांची सरळ लढत होऊन सात सदस्यांचा कौल मिळवत उबाळे आणि ठवाळ हे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काकासाहेब खोसे यांनी काम पाहिले.
फोटो १० शिवप्रसाद उबाळे , १० अनुराधा ठवाळ