केडगाव : नगर तालुका पंचायत समितीत सभापतीपदी शिवसेनेच्या सुरेखा गुंड तर उपसभापतीपदी सेनेचेच डॉ. दिलीप पवार यांची बिनविरोध निवड झाली. विरोधी भाजपच्या सदस्यांनी मतदान प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याने निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. गेल्या १५ वर्षांत पंचायत समितीवर सहाव्यांदा सेनेचा भगवा फडकला.
पंचायत समितीच्या मावळत्या सभापती कांताबाई कोकाटे व उपसभापती रवींद्र भापकर यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने शुक्रवारी पंचायत समितीत सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रिया पार पडली. यापूर्वी सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता. तो शब्द पाळत कोकाटे व भापकर यांनी पदाचे राजीनामे दिले होते. पंचायत समितीत शिवसेना-काँग्रेसचे ८ तर भाजपचे ४ सदस्य आहेत. विरोधकांकडून दगाफटका नको म्हणून सेनेने आठही सदस्य सुरक्षित ठेवले होते. सभापतीपदासाठी सेनेकडून सुरेखा गुंड यांनी तर उपसभापतीपदासाठी सेनेचेच डॉ. दिलीप पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. अर्ज दाखल करण्याची मुदत संपली तरीही विरोधी भाजपचे कोणीच पंचायत समितीकडे फिरकले नाहीत. यामुळे सभापतीसाठी गुंड यांचा व उपसभापतीपदासाठी पवार यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने या दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, प्रकाश कुलट, प्रवीण कोकाटे यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी रा.वी. शिंदे, जीवाजी लगड, अमोल कदम, भाऊसाहेब तापकीर, योगेश लांडगे, ज्ञानेश्वर साठे, प्रवीण गोरे व शिवसैनिक उपस्थित होते.
--
दगाफटका नको म्हणून सेनेची काळजी...
पंचायत समितीत सेना-काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. मात्र विरोधकांकडून काही दगाफटका होण्याची शक्यता गृहीत धरून सेनेने या वेळी काळजी घेतली. गेले पाच-सहा दिवस सर्व सदस्यांना सुरक्षित ठिकाणी एकत्र ठेवले. यामुळे बिनविरोध निवडीची प्रक्रिया सहज पार पडली.
----
शिवसेनेचा सहाव्यांदा सभापती
गेल्या १५ वर्षांपासून पंचायत समितीत जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचेच वर्चस्व राहिले. या वेळी सुरेखा गुंड या सेनेच्या सहाव्या सभापती म्हणून बिनविरोध निवडून आल्या.
---
कोकाटे-भापकर यांचा मोठेपणा
मावळत्या सभापती कांताबाई कोकाटे व उपसभापती रवी भापकर यांना सव्वा वर्षासाठी पदभार पक्षाने दिला होता. कोरोना काळात त्यांना पुरेसा वेळ मिळाला नसतानाही त्यांनी सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपताच पक्षाला दिलेला शब्द पाळत आपल्या पदाचे राजीनामे दिले. जिल्हाप्रमुख गाडे यांनी या दोघांचेही शब्द पाळल्याबद्दल अभिनंदन केले.
--
पंचायत समितीत आमचे बहुमत नाही. विरोधक सर्व एकत्र राहिले. फोडाफोडीच्या राजकारणात रस नाही. त्यामुळे आम्ही निवड प्रक्रियेत भाग घेतला नाही. मात्र चांगले काम करण्यासाठी त्यांना आमचे सहकार्य राहील. सर्वसामान्यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा.
- रवींद्र कडुस,
गटनेते, भाजप, पंचायत समिती
--
२६ नगर पंचायत समिती
नगर तालुका पंचायत समितीच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
(छायाचित्र : नागेश सोनवणे)