संगमनेर :शिवसेना आणि ठाकरे हे कधी वेगळे होऊ शकत नाहीत. निवडणूक आयोगाने तो प्रयत्न केला असेल, परंतू महाराष्ट्रातील जनता काय दुधखुळी नाही. जनतेला राजकारण चांगले समजते. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून त्यांची पातळी सुद्धा खालावली आहे. या संस्थेवर राजकारणाचा दबाव असून त्यातूनच हा राजकीय निर्णय आहे. अशी टीका माजी महसूल मंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्यानंतर आमदार थोरात यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जो निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. तो लोकशाहीला घातक असा आहे. शिवसेना ठाकरे यांच्यापासून वेगळी काढूच शकत नाही. ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण आहे. ही संघटना वाढवण्यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य घातले आहे. त्यामूळे जनता जो निर्णय देईल तो उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच निर्णय देईल.
आपल्याला या निवडणुकांमध्येच तो निर्णय नक्की दिसून येईल. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. निरपेक्ष भावनेने निर्णय देणे, कुणा एकाच्या बाजूने निर्णय न देणे, ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु आजच्या निर्णयाने स्वायत्त संस्थेत किती राजकारण झालेले आहे. हे प्रत्यक्ष उदाहरणासह दिसते आहे. देशात चाललेले राजकारण भारतीय जनता खपवून घेणार नाही आणि त्याला उत्तर देईल. निवडणूक आयोगाच्या बाबतीत राजकारण स्पष्ट दिसते आहे. कधी नव्हता एवढा अन्याय ते लोकशाहीवर करत आहेत. सामान्य जनता सुद्धा हे ओळखून आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड निवडणुकीत जनता लोकशाहीच्या बाजूने उभे राहील आणि याचा फायदा महाविकास आघाडीला होईल.