अनिकेत यादवभिंगार : राज्यात सर्वत्र महाविकास आघाडीचा फॉर्म्युला असताना अहमदनगर छावणी परिषदेमध्ये मात्र शिवसेना-भाजप एकत्र येत शिवसेनेचे प्रकाश फुलारी यांची छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मागच्या वेळी राष्ट्रवादीसोबत असलेल्या भाजप पुरस्कृत सदस्या शुभांगी साठे यांनी सेनेला पाठिंबा दिला. हा एक राष्ट्रवादी काँग्रेसला जोराचा धक्काच मानला जात आहे. डिसेंबर २०१५ मध्ये अनपेक्षितरित्या छावणी परिषदेवर सत्ता काबीज करणाºया राष्ट्रवादीला सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले आहे. छावणी परिषद सदस्यांची मुदत संपल्याने, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने विद्यमान सदस्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. मुदतवाढ देतांना पुन्हा उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार उपाध्यक्षपदासाठी घेतलेल्या निवडणुकीत सेनेचे प्रकाश फुलारी यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे छावणी परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष ब्रिगेडियर विजयसिंग राणा यांनी फुलारी यांना विजयी घोषित केले. भाजपच्या शुभांगी साठे यांनी सेनेला पाठिंबा दर्शवल्याने राष्ट्रवादीने अर्ज दाखल केला नाही. २०१५ साली झालेल्या निवडणुकीत सेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा तर एक जागा भाजप पुरस्कृत उमेद्वाराने पटकावली होती. त्यावेळी भाजप पुरस्कृत शुभांगी साठे यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने मुसाद्दीक सय्यद उपाध्यक्षपदी विराजमान झाले होते. मात्र त्यांची काम करण्याची पद्धत राष्ट्रवादीसह अन्य सदस्यांना खटकत असल्याने गेल्या चार वर्षांपासून आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सय्यद यांना बदलण्याची मागणी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर सहा महिन्यानंतर होणाºया निवडणुकीच्या तोंडावर झालेला बदल हा राष्ट्रवादी पक्षासाठी धक्का मानला जात आहे. काँग्रेस व सेनेचे प्राबल्य असलेल्या भिंगार शहरात राष्ट्रवादीने आश्चर्यकारक मुसंडी मारत छावणी परिषद ताब्यात घेतली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेली उलथापालथ राष्ट्रवादीला परीक्षण करायला लावणारी आहे. राष्ट्रवादीने त्यावेळी बदल करण्यात अनुकूलता दाखवली नसल्याने नाराज सदस्यांनी बुधवारी झालेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सक्रिय न होता शांत बसणेच पसंत केले. उपाध्यक्षपदाची निवडणूक ब्रिगेडियर विजयसिंग राणा, छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी छावणी परिषद सदस्य मिना मेहतानी, शुभांगी साठे,कलीम शेख, रवींद्र लालबोन्द्रे, मुसद्दीक सय्यद, संजय छजलानी उपस्थित होते. माजी आमदार अनिल राठोड, भाजपचे अभय आगरकर यांनी फुलारी यांचा सत्कार केला.
भिंगारमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग फसला शिवसेना-भाजप एकत्र : छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी सेनेचे फुलारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 4:42 PM