अहमदनगर - एका वर्षात सत्तेला लाथ मारून शिवसेना स्वबळावर सत्तेवर येईल. सत्तेला लाथ कधी मारायची हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील. मात्र त्यानंतर तुम्ही सर्वजण एकजुटीने राहून परिवर्तन घडवून आणा असं आवाहन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
नगरमध्ये आयोजित सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. 'राज्यात कोठेही गेलो की विद्यार्थी प्रश्नांची निवेदने घेऊन येतात. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. त्यासाठी शिवसेनेच्या वतीने शैक्षणिक अॅप तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होणार आहे', अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
न्यू आर्ट्स महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर आदित्य ठाकरे रॅलीद्वारे सभास्थानी आले. तेथे युवकांच्या गराड्यातून सभास्थानी गेले. सभेत बोलताना त्यांनी नगर शहराच्या प्रश्न सोडविण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.
आदित्य ठाकरे म्हणाले, "शिवसेना सरकारमध्ये असली, तरी पहारेकऱ्यांच्या भूमिकेत असल्यासारखी आहे. या सरकारमध्ये महिला सुरक्षित नाहीत. युवा वर्ग भरकटला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. व्यापाऱ्यांचे उद्योग डबघाईला आले आहेत. नोटाबंदी, जीएसटीमुळे बाजारपेठा ओस पडू लागल्या आहेत. मग कुठं गेला विकास ?. विकासाच्या नावाखाली अनेक अनुदाने बंद केली आहेत. नोटाबंदीच्या निमित्ताने आमच्या महिलांच्या पर्सवर सरकारने दरोडा टाकला आहे. आता आगामी काळात हे सहन होणार नाही.''
अकरा लाखांचा धनादेश राज्यातील शेतकऱ्यांसाठी नगर शिवसेनेच्या वतीने अकरा लाखांचा धनादेश माजी आमदार अनिल राठोड व पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काहीतरी विकासात्मक कामे करण्यासाठी ही रक्कम सुपूर्द करण्यात आली. आगामी काळात शिवसेना या रकमेद्वारे मदत करणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.