उत्तर नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना त्यांनी पूर्ण ताकदीनिशी स्वबळावर निवडणुका लढविण्याचे आदेश दिले आहेत. संपर्क प्रमुख नरेंद्र दराडे, जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा संघटक डॉ.महेश क्षीरसागर, शहर प्रमुख सचिन बडधे, दादासाहेब कोकणे, राधाकृष्ण वाघुले, निखिल पवार, प्रदीप वाघ, सनी बोरुडे आदींनी श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे बैठक घेतली. तत्पूर्वी कोपरगाव, राहाता येथेही बैठका पार पडल्या. शहरी पक्षाची छाप असलेल्या शिवसेनेला ग्रामपंचायत व आगामी नगरपालिका निवडणुकांतून पक्ष विस्तार करावयाचा आहे. कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी व संघटन बांधणीसाठी ग्रामपंचायती स्वबळावर लढविण्याचे थेट मातोश्रीवरून निश्चित करण्यात आले आहे. आमदार नरेंद्र दराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली.
लोकसभा निवडणुकीनंतर भाऊसाहेब कांबळे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावरून मोठा वादंग झाला होता. शिवसेनेतील एका गटाने कांबळे यांच्या प्रवेशावर गंभीर आक्षेप घेत संपर्क प्रमुख दराडे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर दराडे यांनी काम थांबविले होते. तब्बल एक वर्षानंतर ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आहे. आमदार दराडे यांनी या निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे सांगितले.
जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले, शिवसैनिकांनी स्वत:चे व पक्षाचे वेगळे अस्तित्व अबाधित ठेऊन या निवडणुका लढवाव्यात. जागा वाटप व इतर प्रश्नांवर कोणाशी चर्चा करण्याची वेळ येईल, तिथे वरिष्ठ पदाधिकारी जातील.
जिल्हा संघटक डॉ.क्षीरसागर म्हणाले, या निवडणुका पक्ष चिन्हावर लढविल्या जात नाहीत. मात्र यानिमित्ताने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेशला जाईल. निवडणुकांमध्ये पक्ष व कार्यकर्त्यांचे हीत सांभाळले जावे.
-----------------
निवडणुकांत विजय मिळवून देणे हेच संपर्क प्रमुख म्हणून माझे काम आहे. मात्र श्रीरामपुरात विधानसभेला वादावादी झाल्याने काम थांबविले होते. आता ग्रामपंचायत निवडणुकांपासून नव्याने पक्षाच्या कामात सक्रिय झालो आहे.
-आमदार नरेंद्र दराडे, संपर्क प्रमुख, शिवसेना
-------------