कोपरगाव : शहरासह तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवभक्तांकडून मिरवणूक न काढता शांततेत प्रतिमापूजनासह विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच सर्वच शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, महाविद्यालयात शुक्रवारी ( दि.१९ ) शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कोपरगाव नगरपरिषदेच्यावतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची विद्युत रोषणाई, आकर्षक फुलांच्या माळा तयार करून सजावट करण्यात आली होती. शुक्रवारी पहाटे ५ वाजेपासून तर सकाळी ८ वाजेपर्यंत विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व समित्यांचे सभापती, नगरसेवक तसेच मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, एम. के. आढाव विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते. या अश्वारूढ पुतळ्यास सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
शहरातील सेवा फाऊंडेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या शिबिरात सुमारे ७० पेक्षा जास्त रक्तदात्यानी रक्तदान केले. सूर्यतेज संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत सुमारे १२०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. शिवभक्त प्रतिष्ठानच्यावतीने लायन्स मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शालेय मैदानी खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. शहरातील गोदामाई प्रतिष्ठान व छत्रपती बॉईज यांच्यावतीने गोदावरी नदीच्या पात्राची स्वछता करून वृक्षारोपण करण्यात आले. राजमुद्रा प्रतिष्ठान व राजे प्रतिष्ठान यांच्यावतीने प्रतिमापूजन करण्यात आले. योग प्रचार प्रसार संस्थेतील साधक महिलांनी सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत सूर्यनमस्काराची मोहिम राबविली. निवारा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत रोग प्रतिबंधकऔषध फवारणी यंत्र भेट देण्यात आले.
तसेच ग्रामीण भागात वारी ग्रामपंचायतीत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अंजनापूर येथील शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने प्रतिमेचे पूजन करून महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला. तसेच शहरासह तालुक्यातील शिवप्रेमींनी आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना मोठमोठे भगवे झेंडे लावले होते.