योगेश गुंड
केडगाव : नगर तालुक्यातील ग्रामपंचायतीपाठोपाठ सहकार क्षेत्रातही माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. सेवा संस्था मतदारसंघात एकतर्फी बाजी मारून त्यांनी यावर शिक्कामोर्तब केले. जिल्हा बँकेच्या संचालकपदी त्यांनी आपली हॅटट्रिक पूर्ण केली.
जिल्हा बँकेच्या नगर तालुका सहकारी सेवा संस्था मतदारसंघातून कर्डिले यांना १०९ पैकी ९४ मते मिळाली. मागील दोन्ही वेळी कर्डिले याच मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले. यंदाही ते सहज बिनविरोध निवडून येतील असा अंदाज वर्तविण्यात येत होता. जिल्ह्यातील इतर जागा बिनविरोध करण्यासाठी कर्डिले यांनी आपले राजकीय कौशल्य दाखवून दिले. मात्र त्यांचीच जागा बिनविरोध करण्यात त्यांना यश मिळाले नाही. कर्डिले विरोधात नगर तालुक्यातील शिवसेना व राष्ट्रवादीचा एक गट एकवटल्याने त्यांनी केवळ राजकीय विरोध म्हणून कर्डिले यांच्या बिनविरोध निवणुकीचे मनसुबे उधळून लावले. यात कर्डिले यांनी एकतर्फी बाजी मारत तालुक्यातील सहकाराच्या राजकारणात आपल्या वर्चस्वावर पुन्हा शिक्कामोर्तब केले. गेली काही महिने कर्डिले यांनी नगर तालुक्यातील गावोगावी जिल्हा बँकेच्या माध्यमातून खेळते भांडवल म्हणून जिरायती भागातील शेतकऱ्यांना कर्जवाटप मोहीम सुरू केली. त्याची जिल्हाभरात चर्चा झाली. हे सुरू असतानाच त्यांनी बँक निवडणुकीचीही मोर्चेबांधणी केली. तालुक्यातील ९० टक्के सेवा संस्थांचे ठराव आपल्या मर्जितील लोकांचे केले. हे होत असताना तालुक्यातील त्यांचे विरोधक बेसावध राहिले. इतकेच काय कर्डिले यांच्या विरोधात लढण्याची वल्गना करणाऱ्यांच्या नावाने ठरावही झाले नाहीत. कर्डिले यांनी मुत्सद्दीपणे या निवडणुकीचा शेवट गोड केला. मात्र बिनविरोध होता आले नाही याचे शल्य त्यांना आहेच.
....
विरोधकांचेही मनोबल वाढले
जिल्हा बँकेत आपल्या विजयाची हॅटट्रिक करणाऱ्या कर्डिले यांनी तालुक्यातील १०९ पैकी १०२ मतदार आपल्या पाठिशी असल्याचा दावा सुरुवातीपासून केला खरा. पण मतमोजणीत त्यांना ९४ मते मिळाली. त्यांची काही मते फुटल्याने विरोधकांचे मनोबल वाढले अशी चर्चा सुरू झाली आहे.
....
६३ वर्षात नगर तालुक्याला तीनदाच संधी
अहमदनगर जिल्हा बँकेची स्थापना होऊन ६३ वर्षांचा काळ लोटला. एवढ्या मोठ्या कालखंडात नगर तालुक्याला किसनराव हराळ, दादा पाटील शेळके, शिवाजी कर्डिले यांच्या रूपाने अध्यक्षपदाची संधी मिळाली. हे तीन जण सोडले तर बँकेच्या अध्यक्षपदी जवळपास साखर कारखानदारांनाच संधी मिळाल्याचे दिसून येत आहे.
...