अहमदनगर : भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याशी जुनी मैत्री आहे. या मैत्रीनेच माझा घात झाला. राष्ट्रवादीसोडून इतर सर्व पक्षांतील नेत्यांशी माझी चांगली मैत्री आहे. मात्र त्यांच्यापैकी नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिकांनीच माझ्यावर डाव टाकून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना माझ्या घरी पाठवून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मात्र महापालिकेतील युती अभद्र आहे. या युतीमुळे मी नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस डॅमेज झाली, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी भाजपला उघडपणे मतदान केले. त्याचदिवशी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी दादा कळमकर यांच्या घरी भेट दिली. आ. शिवाजी कर्डिले यांनी यासाठी मध्यस्थी केली होती. याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. महापालिकेतील भाजपला मदत करण्यात दादा कळमकर यांचाच पुढाकार असल्याचा संदेशही शहरात गेला. त्यानंतर कळमकर यांनी सदरची युती मान्य नसल्याचेही स्पष्ट केले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी कारवाईची प्रक्रिया सुरू केल्यानंतर कळमकर यांची बदनामी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. त्याअनुषंगाने कळमकर यांनी मंगळवारी दुपारी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.कळमकर म्हणाले, माझे पक्षातील लोकांनीच चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला असून तो निंदनीय आहे. त्यावर जनता आणि पक्षातील वरिष्ठ नेते विश्वास ठेवणार नाहीत. ‘ते’ अडचणीत आले तर राष्ट्रवादी शिल्लक राहिली नाही पाहिजे.कळमकर पक्षात राहिले तर पक्ष वाढू शकतो. पक्ष संपवायलाच ते निघाले आहेत. ते म्हणजे राष्ट्रवादीतील कोणीतरी माझे हितचिंतक असून पक्षातील नंबर दोनच्या फळीतील असल्याचे कळमकर म्हणाले. महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याच्या प्रक्रियेत मी कुठेच नव्हतो. हे मी विशाल गणपतीवर हात ठेवून सांगू शकतो.महापौर निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाचे नेते एका बसमध्ये आले, त्यावेळी हे मला समजले. भाजपसोबत जाऊ नका, हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले होते. महापौर निवडीच्या प्रक्रियेत नसताना संभ्रम निर्माण करून मला गोवण्यात येत आहे. मुळात महापालिकेत झालेली युती अभद्र आहे. ज्या गोष्टीमुळे शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना मान खाली घालावी लागेल किंवा पक्ष डॅमेज होईल, असे कृत्य माझ्या हातून कदापिही होणार नाही. महापलिकेत राष्ट्रवादी विरोधात बसली असती तर पक्षाची हानी झाली नसती.लोकसभेसाठी नाव आल्याने बदनामीदक्षिण लोकसभेसाठी शरद पवार यांच्या डायरीत तीनच नावे होती. त्यात माझे नाव आल्याने महापौर निवडीचा संदर्भ देऊन मला जास्त बदनाम केले गेले. काही कारवाई झाली तरी कळमकर हेही पक्षात राहिले नाही पाहिजे, असे षडयंत्र रचले गेले. महाजन यांना घरी घेऊन येण्याचा डाव माझ्यावर टाकला गेला. कर्डिले यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला. महाजन घरी येत असतील तर त्यांना नाही कसे म्हणायचे? या बाबीची शरद पवार यांना कल्पना दिली. माझा घात केल्याचेही त्यांना सांगितले. मात्र एका दैनिकाच्या पत्रकाराच्या मदतीने महाजन यांच्या भेटीचा फोटो व्हायरल करून मला बदनाम केले गेले. महाजन व माझी भेट हा एक अपघात होता. आगामी काळात जगताप यांच्यासोबत असणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले, हा जर-तरचा प्रश्न आहे. दोन्ही आमदार जगतापांसाठी वेळोवेळी पक्षाकडे शिष्टाई केली. दोघे पिता-पुत्र आमदार व्हावेत, यासाठीही पक्षाकडे आणि जनतेत प्रचार करून प्रयत्न केले, अशी आठवणही त्यांनी सांगितली. महापौर निवडणुकीत पाठिंबा देण्याची कृती पक्षाच्या धोरणाविरुद्ध असल्याने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, मात्र तो अधिकार प्रदेशचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवाजी कर्डिले यांनी मैत्रीत घात केला : दादा कळमकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 6:15 PM