कोपरगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा सोने, चांदीच्या टाक स्वरूपात येत्या ३१ मार्चपासून महाराजांच्या जयंतीनिमित्त विसपुते सराफी पेढीवर ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर एक मराठी व्यावसायिक आणि शिवप्रेमी म्हणून हा दिवस आमच्यासाठी अत्यंत भाग्याचा असल्याची भावना विसपुते सराफ पेढीचे संचालक दीपक विसपुते यांनी व्यक्त केली आहे.
विसपुते म्हणाले, महाराजांविषयीची प्रत्येक मराठी माणसाच्या मनातली भावना प्रकट करण्यासाठी हा टाक बनवला आहे. असा टाक ग्राहकांना उपलब्ध करून देणारे विसपुते सराफ हे कोपरगाव पंचक्रोशीतील पहिले सराफ असणार आहेत. शिवप्रेमींसाठी शिवाजी महाराज पेंडंट, राजमुद्रा पेंडंट व अंगठीदेखील उपलब्ध आहे. आपल्याकडे देवघरात अनेक देवदेवतांच्या मूर्ती असतात आणि टाक फक्त कुलदेवतेचाच असतो. खंडोबा, भैरोबा, अंबाबाई, रेणुकामाता देवतांचे टाक प्रत्येक घरात असतात. घरात होणाऱ्या प्रत्येक मंगलप्रसंगी, सणावाराला या टाकाची विशेष पूजा, कुळाचारही केला जातो, त्यामुळे आपल्या परंपरेत चांदीच्या टाकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
या टाकाच्या माध्यमातून महाराजांची घरोघरी दररोज पूजा केली जाईल. हा टाक चांदीमध्ये तसेच सोन्यामध्ये बनवला असून, त्याचा पृष्ठभाग तांब्याचा आहे. सोने, चांदी आणि तांबे हे तिन्ही धातू माणसाला अत्यंत उपकारक असतात. पंचतत्वाचे प्रतीक म्हणून टाक नेहमीच पंचकोनी असतात. दररोज पूजेच्या निमित्ताने हाताळण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी उत्तम असतील, असे हे टाक बनवले गेले आहेत, असेही विसपुते यांनी सांगितले. कोपरगावकरांनी महाराजांची छबी असलेला टाक अवश्य आपल्या देवघरात ठेवावा. किंबहुना आपल्या कुटुंबातील लहानग्यांच्या हातून याची प्राणप्रतिष्ठापना करावी, असेही आवाहन विसपुते सराफी पेढीचे संचालक यश विसपुते आणि प्रेम विसपुते यांनी केले आहे. (वा. प्र.)
.............
फोटो२७ - छ. शिवाजी महाराज टाक प्रतिमा - कोपरगाव