तहसीलदार पाटील यांनी नुकतीच नाऊर-जाफराबाद, रामपूर आदी भागातील शिवरस्त्यांची पाहणी केली. शिंदेवस्तीसह नाऊर जाफराबाद रस्त्याचे लोकसहभागातून १२ किलोमीटर रस्त्याचे सुमारे १० लाख रुपये ग्रामस्थांनी खर्चून केलेले काम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
अनेक वर्षांपासून शिव रस्त्यावर दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना वाहतुकीला अडचणी येत होत्या. शेतमालाची वाहतूक व मशागत करणे कठीण झाले होते. तहसीलदार पाटील यांनी जाफराबादचे सरपंच संदीप शेलार, नाऊरचे सरपंच सोन्याबापू शिंदे, माजी सरपंच प्रताप देसाई यांच्यासह मंडल अधिकारी व कामगार तलाठी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्या समवेत पाहणी करत रस्त्याचे महत्त्व समजावून सांगितले.
त्यानंतर आठवडाभरात ग्रामस्थांनी चर्चा करत लोकसहभागातून अतिक्रमणे काढून रस्ता करण्याचे नियोजन केले. सर्वांनी सहकार्य केल्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण झाले, अशी माहिती संदीप शेलार यांनी दिली.
तहसीलदार पाटील यांनी येथे भेट देऊन पाहणी केली. शिवरस्ते ही गावची गरज आहे. रस्त्यांची कोणालाही अडवणूक करता येत नाही. तसे केल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाते. शिवार रस्त्यावर पाणंदमधून मुरुम टाकण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे अनेक कार्यक्रम हाती घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कुळकायद्याचे अव्वल कारकून चांद देशमुख, चंद्रकांत गहिरे, तलाठी ए.जे. तेलतुंबडे, माजी सरपंच प्रताप देसाई, सेवानिवृत्त शिक्षक एस.आर.शिंदे, विजय नानेकर, दिगंबर देसाई, दीपक देसाई, गोरख देसाई, इनायत अत्तार, शेतकरी आदी उपस्थित होते.
--------