राहुरी : राहुरी फॅक्टरी येथील शिवबा प्रतिष्ठान प्रवाशांच्या मदतीला धावत आहे. नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करणाºया भुकेल्या प्रवाशांना प्रतिष्ठानतर्फे भोजन दिले आहे. २१ मार्चपासून रोज हा उपक्रम राबविला जात आहे. रोज सातशे लोकांना भोजन दिले जात आहे.नगर-मनमाड मार्गावरून ये-जा करणाºया प्रवाशांची उपासमार लक्षात घेता आदिनाथ कराळे व त्यांच्या मित्रांनी पुढाकार घेत राहुरी फॅक्टरी येथील मराठी शाळेमध्ये सोशल डिस्टन्स ठेवून भोजनाची व्यवस्था केली आहे. प्रवाशांबरोबर राहुरी फॅक्टरी येथील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींनाही भोजनाचा लाभ मिळत आहे. २१ मार्चपासून शिवबा प्रतिष्ठानने पुढाकार घेत अन्नछत्र सुरू केले आहे. स्वयंपाक करणे भाजीपाला, किराणा, मेडिकलची सुविधा शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.शिवबा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विविध कामाची विभागणी केली आहे. त्यामुळे सुरळीत पद्धतीने भोजन यंत्रणा सुरू आहे. भोजन व्यवस्थेसाठी तनपुरे साखर कारखाना संचलित मराठी शाळेच्या दहा खोल्या ताब्यात घेण्यात आला असून तिथे राहण्याची व आंघोळीची व्यवस्था करण्यात आली आहे. गरजू व्यक्ती भोजन केल्यानंतर गर्दी न करता आपापल्या घरी जात आहेत. शिवबा प्रतिष्ठानचे कार्य पाहून लोकही उस्फूर्तपणे मदतीचा हात देत आहे. लोकसहभागातून किराणा व धान्य उपलब्ध होत आहे. सकाळी पोळी-भाजी व सायंकाळी मसाला भात उपलब्ध करून देण्यात येत आहे. राहुरी फॅक्टरी येथील शिवबा प्रतिष्ठानने राबविलेल्या भोजनालयाच्या अनेकांनी कौतुक केले आहे.
भुकेलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावले शिवबा प्रतिष्ठान; दररोज सातशे लोकांना दिले जातेय भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 1:01 PM