संगमनेर (जि. अहमदनगर) : कार चालकाने पुलावर चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करत अचानक कारचा वेग कमी केल्याने शिवशाही बसच्या चालकाला ब्रेक दाबावा लागला. या बसला पाठीमागून येणारा आयशर टेम्पो धडकला. या अपघातात टेम्पो चालक, क्लिनर, शिवशाही बसचालक आणि बसमधील सहा प्रवासी असे एकुण ९ जण जखमी झाले. शनिवारी (दि. २३) रात्री आठच्या सुमारास नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर म्हाळुंगी नदीच्या पुलावर हा अपघात घडला.
शुभम वाबळे (आयशर टेम्पो चालक, वय २४) स्वप्नील शेळके (वय ३४, टेम्पो क्लिनर) (दोघेही रा. पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे), अनिकेत सहाणे (शिवशाही बसचालक, रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), नीलिमा कचवे (बसमधील प्रवासी वय ५६, रा. वाघोली, पुणे) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. वाबळे, शेळके आणि कचवे यांना उपचारार्थ संगमनेर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. किरकोळ जखमी झालेल्यांची नावे समजू शकली नाही. शिवशाही बस (एम. एच. १४, जी. यू. ३१०८) आणि आयशर टेम्पो (एम. एच. १२, क्यू. जी. ५२३७) या पुण्याहून नाशिकला जात असलेल्या दोन्ही वाहनांना अपघात झाला. शिवशाही बसचालक सहाणे हे संगमनेरमधील असल्याने त्यांनी लगेचच संपर्क केल्याने जखमींना तात्काळ मदत मिळू शकली. छाती आणि पायाला मार लागला असतानाही त्यांनी जखमींना उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केले.
संगमनेर आगार प्रमुख नीलेश करंजकर, संगमनेर तालुक्यातील रहिवासी आणि शिवशाहीचे बसचालक दिगंबर लंके (रा. सारोळे पठार, ता. संगमनेर), विकास पानसरे (रा. घुलेवाडी. ता. संगमनेर), रमेश जगताप (रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर) हे देखील मदतीसाठी धावून आले. अपघात झाल्याचे पाहून चुकीच्या पद्धतीने पुलावर ओव्हरटेक करणारा कारचालक पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सह्यायाने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.