अकोले : तालुक्यातील मनोहरपूर येथील दोन सख्ख्या भावांचा वीजपंप चालू करताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. सुगाव बुद्रूक शिवारात प्रवरा नदीपात्रालगत मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. सुयोग दत्तात्रय भांगरे (वय १७) व नितीन दत्तात्रय भांगरे (वय १५) अशी त्यांची नावे आहेत. सुयोग बारावीत, तर नितीन दहावीत शिक्षण घेत होता. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारात हे दोघे भाऊ वीजपंप चालू करण्यासाठी सुगाव बुद्रूक शिवारातील प्रवरा नदीकाठावर गेले. बराच वेळ प्रयत्न करूनही वीजपंप चालू न झाल्याने त्यांनी नदीतून तारेने बांधलेला फूटबॉल वर ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच वेळी तारेत विद्युत प्रवाह उतरल्याने दोघेही नदीपात्रात फेकले गेले. पाण्यातही वीजप्रवाह उतरल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. बराच वेळ झाला तरी मुले परतली कशी नाहीत, म्हणून त्यांना पाहण्यासाठी कुटुंबातील काहीजण नदीपात्राकडे गेले. दरम्यान, कुंभेफळ शिवारात नदीला आंघोळीसाठी गेलेल्या काही मुलांनी ही घटना पाहिली. त्यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. तो पर्यंत मुलांचे कुटुंबीयही पोहोचले होते. समोर मुलांचे मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. नंतर इतर काही जणांनी मृतदेह पाण्याबाहेर काढले. अकोले ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी) महावितरणविरुद्ध संताप सदोष वीज यंत्रणेमुळे मुलांचा जीव गेला, अशी तक्रार करून ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा पाढा वाचला. ग्रामीण भागात आधीच भारनियमनाने ग्राहक मेटाकुटीला आले असताना सदोष यंत्रणेमुळे जर असे अपघात होऊ लागले तर त्याला महावितरण जबाबदार आहे, असा संताप शेतकर्यांनी व्यक्त केला.
सख्ख्या भावांचा ‘शॉक’ लागून मृत्यू
By admin | Published: May 21, 2014 12:28 AM