पाथर्डी : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घराणेशाही, तेच ते चेहरे यांना डावलून तरुणांनी या निवडणुका हातात घेतल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. आमदार मोनिका राजळे व राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे या दोन्ही नेत्यांनी मात्र या निवडणुकीत थेट सहभाग घेतला नाही. तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायत बिनविरोध निवडण्यात आल्या. तालुक्याच्या पूर्व भागात तर अनेक गावात भारतीय जनता पक्षाचेच दोन गट एकमेकांविरुद्ध लढले. यंदाच्या निवडणुकीत तरुणांनी बहुतांशी गावात आघाड्या करून निवडणूक लढविली होती. यात त्यांना अपेक्षित यश मिळाल्याचे दिसत आहे. कासारपिंपळगाव ग्रामपंचायतीमध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या जाऊ मोनाली राजळे यांच्या पॅनेलने सर्वच्या सर्व विजय मिळविला. त्यांच्या विरोधात त्यांचे चुलत सासरे अर्जुनराव राजळे यांनी पॅनेल उभे केले होते. या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत आमदार मोनिका राजळे यांच्या जाऊ मोनाली राजळे यांनी बाजी मारली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांच्या अकोला या गावात ढाकणेंचे चुलत भाऊ अनिल ढाकणे यांच्या पॅनेलला पराभव पत्करावा लागला. त्यांना अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे ही ग्रामपंचायत ढाकणे यांच्या ताब्यात होती. गावाचे सिंहासन ताब्यात घेण्यासाठी सर्वांनीच अटापिटा केला होता. परंतु बहुतांशी ग्रामपंचायतींमघ्ये तरुणांनी बाजी मारत प्रस्थापितांना घरी बसवल्याचे दिसत आहे. आता मात्र सरपंचपदाचे आरक्षण कोणते पडते, यावर मात्र बरेच अवलंबून राहणार आहे. या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या गेल्या नसल्यामुळे कोणत्या गावात काय होईल, हे आत्ताच सांगणे कठीण जाणार आहे.
पाथर्डीत प्रस्थापितांना तरुणाईचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:23 AM