अकोले (जि. अहमदनगर) : शहरातील अगस्ती थेटर गल्ली येथून सोमवारी दुपारी आडीच वाजण्याच्या दरम्यान रूद्र आकाश पवार हा पाच वर्षाचा मुलगा गायब झाला होता. नातेवाईक, अकोलेकर व पोलिसांनी शहर पिंजून काढत शोध घेतला. त्याचा मृतदेह चिरेबंदी परिसरात एका अडगळीतील ७० फूट खोल आडात रात्री उशिरा साडे अकराच्या सुमारास आढळून आला आणि त्याच्या आईवडीलसह नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
दुपारी जेवण झाल्यानंतर रूद्र खेळायला घरा बहार पडला होता. शहरात संक्रांतीची पतंग उडवण्याची धूम सुरू असताना काही कटलेले पतंग गोळा करण्यासाठी धावपळीत होते. चिमुकला रूद्र पतंग खेळत मुलांसोबत होता. घरी लवकर न आल्याने रूद्रची शोधाशोध सुरू झाली. पोलिसांनी पाच पथके रवाना करुन अनेक संशयित बाबी तपासल्या. सोशल मीडियावर देखील पोस्ट व्हायरल करण्यात आले. नदी, नाले, ओढे, गटारी अशी अनेक ठिकाणे पायाखाली घातली व शोधली. मात्र, रात्री ११ वाजले तरी त्याचा शोध लागला नाही.त्यानंतर जी मुले दुपारी पतंग खेळत होती. त्यांचाकडे चौकशी केली आणि काही ठिकाणी सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर या मुलाचा मागमुस लागला. अंतीमतः सखोल तपास करताना चिरेबंदी वाडा येथील एका ७० फुट आडात संबंधित मुलाचे प्रेत दिसून आले. त्यानंतर त्याची आई आणि वडिलांनी एकच टाहो फोडला. पतंग खेळने चिमुकल्याचा बळी घेतला.संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.