अहमदनगर: कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद करण्यात नावलौकिक असलेल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने चक्क मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला सोडून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अतुल उर्फ बबन भाऊसाहेब घावटे (रा. राजापूर, ता. श्रीगोंदा) असे सोडून दिलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
निगडी (पिंपरी-चिंचवड) पोलीस ठाण्यात घावटे याच्यासह चौघांविरोधात २१ डिसेंबर २०२० रोजी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. या गुन्ह्यातील इतर तीन आरोपींना अटक झालेली आहे. घावटे मात्र घटना घडल्यापासून फरार असून निगडी पोलीस त्याचा चौफेर शोध घेत आहेत. घावटे याच्यावर सुपा, शिरुर, बेलवंडी आदी पोलीस ठाण्यातही खून, दरोडे, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, अपहरण आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांनी बबन घावटे याला ताब्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर पथकाने ४ फेब्रुवारी रोजी त्याला श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथून दुपारी अटक केली. घावटे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले. येथे मात्र केवळ चौकशी करून त्याला सोडून देण्यात आले. निगडी पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी नगर पोलिसांनी का सोडला याची आता चर्चा सुरू झाली आहे.
निगडी पोलीस ठाण्यात २१ डिसेंबर २०२० रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई झालेली असून यातील बबन घावटे याचा शोध सुरू असल्याचे या गुन्ह्याच्या तपासी अधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
निगडी येथे गोळीबाराच्या गुन्ह्यातील आरोपींना बबन घावटे याने पिस्तूल पुरविल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. सर्व आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई झालेली असून, आम्ही घावटे याचा शोध घेत आहोत. तो मात्र अद्यापपर्यंत मिळून आलेला नाही.
- गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निगडी पोलीस स्टेशन
अतुल उर्फ बबन भाऊसाहेब घावटे याच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याला कार्यालयात चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. सध्या तो कोणत्याही गुन्ह्यात वान्टेड (पाहिजे असलेला आरोपी) नसल्याने त्याला समज देऊन सोडून देण्यात आले आहे.- अनिल कटके, निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर