अण्णा नवथरलोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र येत भाजपचे माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांना मोठा धक्का दिला. जिल्ह्याच्या राजकारणातील किंगमेकर राधाकृष्ण विखे व शिवाजीराव कर्डिले हे दोन प्रमुख नेते सोबत असूनही भाजपाला जिल्हा परिषदेत सपशेल माघार घ्यावी लागली. भाजपसह विखे, कर्डिले आणि राम शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो.राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे प्रमुख पक्ष एकत्र आले. त्याची पुनरावृत्ती नगर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झाली. जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडीची सत्ता होती. अध्यक्ष काँग्रेसकडे, तर उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे होते. आघाडीने पहिले अडीच वर्षे एकत्रित कारभार केला. भाजप अडीच वर्षे विरोधात होते. दरम्यानच्या काळात राधाकृष्ण विखे व डॉ. सुजय विखे हे विखे पिता-पुत्र भाजपवासी झाल्याने जिल्ह्यातील भाजपला बळ मिळाले. म्हणूनच विखेंच्या ताकदीवर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा भाजपाचा मनसुबा होता. भाजपने जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीची सूत्रे विखे यांच्याकडे सोपविली होती. विखे यांनी जिल्हा परिषदेत जुळवाजुळव करण्याचा प्रयत्नही केला. परंतु, पत्नी शालिनी विखे यांना अध्यक्ष करताना केलेला करिष्मा त्यांना यावेळी दाखविता आला नाही. विखे हे चमत्कार घडवतील, अशी अशा भाजपचे नेतेही बाळगून होते. पण, अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना महाविकास आघाडीला आव्हान देता येईल, एवढे संख्याबळही जुळविता आले नाही. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि गडाख प्रणित क्रांतिकारी या प्रमुख पक्षाच्या नेत्यांची घट्ट पकड, यामुळे भाजपाला फोडाफोडीत यश आले नाही. महाविकास आघाडीतील काहींना गळाला लावण्याचा विखे यांच्यासह माजीमंत्री राम शिंदे आणि शिवाजीराव कर्डिले यांनी प्रयत्न केला. पण एकही पक्ष गळाला न लागल्याने ऐनवेळी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. भाजपची ही माघार महाविकास आघाडीला बळ देणारी असून, विखे यांच्यासह भाजपासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जाते. ....पराभवाला आमदारांतील नाराजीची किनारविधानसभेच्या निवडणुकीतील पराभवाचे खापर भाजपाच्या पराभूत आमदारांनी माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर फोडले. ही घटना ताजी असतानाच जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाल्याने या निवडणुकीतील पराभवाला आमदारांतील नाराजीचीही किनार असल्याचे बोलले जाते.
नगर झेडपीत महाविकास आघाडीचा विखेंना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 5:23 PM