लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर): महावितरण कंपनीकडून यापूर्वीच २० टक्के वीज दरवाढ करण्यात आली आहे. आता पुन्हा दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन शोले स्टाईल आंदोलन करत सरकारचा निषेध केला. प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करावी, असा फलक डुंगरवाल यांनी हाती घेतला.
देशात सर्वात महाग वीज राज्यात आहे. तरीही आता वीज कंपन्यांकडून वीज दरवाढ प्रस्तावित आहे. यापूर्वीच्या महाविकास आघाडी तसेच भारतीय जनता पक्षाच्या सरकारांनी १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले होते. वीज धोरणाबाबत भाजप शासित तसेच इतर राज्यांकडे बोट दाखविले जात होते. मोफत विजेच्या घोषणाही केल्या गेल्या. प्रत्यक्षात मात्र तसे काहीही झाले नाही, असा आरोप डुंगरवाल यांनी केला.
दिल्लीतील आप पक्षाचे केजरीवाल सरकार आठ वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत देत आहे. पंजाब सरकारनेही जुलै पासून ३०० युनिट घरगुती आणि शेतकऱ्यांना मोफत वीज केली आहे. महाराष्ट्रात हे का शक्य नाही? असा सवाल डुंगरवाल यांनी केला. शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या टाकीवर चढून त्यांनी प्रस्तावित वीज दरवाढीवरून राज्य सरकारचा निषेध केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"