सैन्यात भरती झाल्यानंतर मोठ्या धामधुमीत मुलाचे लग्न करायचे, असा विचार करून आई-वडिलांनी मुलगी पाहिली. त्या मुलीबरोबर विलास दिघे यांचे लग्नही ठरवले. पण विलास दिघे यांनी नम्रपणे अगोदर देशसेवा आणि नंतर लग्न असे आई-वडिलांना पटवून दिले. त्याच साली जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी विलास दिघे यांनी निकराचा लढा दिला.नोव्हेंबर १९९६ रोजी जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हफ्रुडा जंगलात अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय सैन्य दलाकडून आॅपरेशन रक्षक राबविण्यात येत होते़ बिहार रेजिमेंटरचे लेफ्टनंट कर्नल एस़ एस़ राणा यांनी जंगलात लपलेल्या अतिरेक्यांचा एक गट शोधून ठार करण्याची जोखमीची मोहीम फत्ते केली़ परंतु अतिरेक्यांच्या दुसऱ्या गटाने राणा आणि त्यांच्या टीमवर पाळत ठेवून अचानक अंदाधुंद गोळीबार केला़ त्यात लेफ्टनंट कर्नल राणा शहीद झाले़ अनेक भारतीय सैनिकांनाही प्राण गमवावा लागला़ त्यामुळे भारतीय सैन्यदलाने या जंगलात सैन्यबळ वाढविण्याचा निर्णय घेतला़ सर्व अतिरेक्यांचा खात्मा करण्याचा आदेश सैनिकांना देण्यात आला़ वेगवेगळ्या तुकड्या वेगवेगळ्या दिशेने जंगलात घुसल्या होत्या़ यातीलच एका तुकडीत वडझिरे (ता़ पारनेर) येथील विलास दिघे यांचा समावेश होता़ नोव्हेंबरच्या अखेरीस दिघे यांची तुकडी हाफ्रुडा जंगलात पोहोचली़उंचच उंच बर्फाळ डोंगर रांगा आणि घनदाट वनराईतून मार्ग काढीत भारतीय सैन्य अतिरेक्यांचा शोध घेत होते़ दोन आठवड्यांपासून हा शोध सुरु होता़ कोठेही संशयित हालचाली दिसून येत नव्हत्या़ १३ डिसेंबर १९९६ चा तो दिवस होता़ भारतीय सैन्य उंचच उंच डोंगर आणि झाडाझुडपात अतिरेक्यांचा शोध घेत होते़ अचानक एका डोंगराच्या सुळक्यांचा आधार घेऊन झाडीत लपलेल्या अतिरेक्यांनी भारतीय जवानांवर जोरदार गोळीबार आणि बॉम्ब वर्षाव केला़ भारतीय जवानांनी अतिरेक्यांवर गोळीबार, बॉम्ब टाकले़ यात काही अतिरेकी मारले गेले आणि काही पळून गेले़ त्याचवेळी या डोंगराच्या दुसºया बाजूला लपलेल्या अतिरेक्यांनी भारतीय सैन्यावर उंचावरुन एक बॉम्ब फेकला़ हा बॉम्ब सर्वात पुढे असलेल्या विलास दिघे यांच्यासह इतर काही सैनिकांवर जाऊन आदळला़ या बॉम्ब हल्ल्यात दिघे यांच्यासह इतर काही सैनिकांचे देह छिन्नविछिन्न झाले़ या सैनिकांचे पार्थिव कुटुंबीयांकडे कसे पाठवायचे, असा प्रश्न सैन्य दलापुढे उभा राहिला़ अखेरीस सैन्य दलानेच दिघे यांच्यासह इतर सैनिकांचा शासकीय इतमामात अंत्यविधी केला़ त्यामुळे दिघे यांचे पार्थिवही कुटुंबीयांना मिळू शकले नाही़ मुलगा देशासाठी कामी आला, हा अभिमान दिघे कुटुंबीयांना आजही आहे़ पण खंतही आहे की, मुलाचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही़आई, वडिलांना अश्रू अनावरवडझिरे येथील गणपत रंगनाथ दिघे व गंगुबाई गणपत दिघे यांना बाळू, सुनील व विलास हे तीन सुपुत्र होते़ त्यापैकी विलास हे सैन्यदलात भरती झाले होते़ गणपत दिघे यांना अवघी दोन एकर जमीन होती़ गणपत व गंगुबाई यांनी अत्यंत कष्टाने शेती करीत तीन मुलांना शिकवले़ त्यांचे संसार उभे केले़ विलास याचे शिक्षण पहिली ते दहावीपर्यंत वडझिरे गावातील शाळांमध्येच झाले़ विलास यांनी दहावीनंतर काही काळ गावातच मजुरीची कामे केली़ नंतर सैन्यदलात भरती असल्याची माहिती मिळताच त्यांनी मित्रांसमवेत थेट बेळगाव गाठले़ २६ आॅगस्ट १९९३ मध्ये त्यांच्या कष्टाला यश मिळाले व ते सैन्यदलात भरती झाले़ भरती झाल्यानंतर वर्षभर बेळगाव मध्येच प्रशिक्षण घेतले़ त्यांना पहिलीच पोस्टींग जम्मूकश्मीरमध्ये मिळाली़ त्यावेळी जम्मू काश्मीर अतिरेकी हल्ल्यांनी सारखे धुमसत होते़ अतिरेक्यांच्या धुमश्चक्रीतच विलास दिघे यांना वीरमरण आले़ हे बातमी दिघे कुटुंबीयांना सांगण्याचे धाडसही प्रशासनात उरले नव्हते़ पोलीस व सैनिक घरी येत आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही धीर सोडू नका असा सल्ला देत होते़ त्यामुळे आपला मुलगा विलास देशासाठी शहीद झाल्याचे आम्ही समजून घेतले़ विलासचे अंतिम दर्शनही झाले नाही, असे म्हणतच वीरमाता गंगुबाई व वडील गणपत दिघे यांना ‘लोकमत’शी बोलताना अश्रू अनावर झाले़गावात स्मारक नाही, कुटुंबीयांना सुविधाही नाहीविलास यांचे वडील गणपत व वीरमाता गंगुबाई हे वडझिरे येथील दिघे मळ्यात राहतात़ शेती करूनच हे कुटुंब उदरनिर्वाह करीत आहे़ गावात विलास दिघे यांचे स्मारक व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे़ त्यावेळी मुंबई किंवा नगरला शासनातर्फे घर देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते़ परंतु अद्याप त्यांना ना घर मिळाले ना इतर कोणत्या सुविधा़दरवर्षी सैनिक दिवाळीला यायचेविलास दिघे हे शहीद झाल्यानंतर अनेक वर्षे दिवाळीला काही सैनिक घरी येत होते़ त्यावेळी आम्हाला वेगवेगळ्या वस्तू भेट देऊन निघून जात होते़ फक्त विलासने देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून सैनिक घरी येऊन थांबायचे़ यामुळे दिवाळीला आमचा विलासच घरी आल्याचा आनंद होत होता, असे सांगत वडील गणपत यांनी अश्रूंना मोकळी वाट करुन दिली़लग्न ठरवले, मुलगी घरी आली, पण संसारच नाहीविलास यांना सैन्यात नोकरी लागल्यानंतर दोन वर्षांनी वडील गणपत व आई गंगुबाई यांनी विलासचे लग्न करायचे ठरवले़ विलास यांनी आधी देशसेवा, मग लग्न असे सांगत तूर्त लग्नास नकार दिला़ मात्र मामाचीच मुलगी असल्याने तिच्याबरोबरच विलास यांचा विवाह करायचा निश्चित केले होते़ त्यामुळे त्या मुलीला विलास यांच्या आई, वडिलांनी आपल्या घरी वडझिरेत शिक्षण घेण्यासाठी ठेवून घेतले़ आपली मुलगी आपल्याच घरी जात आहे, म्हटल्यावर मुलीच्या आई, वडिलांनीही या लग्नास तत्काळ होकार दिला़ मुलगी वडझिरे येथे येऊन शिकू लागली़ पण जम्मूकाश्मीरमध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांच्या विरोधात लढा देताना विलास शहीद झाले़ लग्न ठरवले होते़ मुलगी घरी आणली होती़ पण विलास यांचा संसारच होऊ शकला नाही, असे सांगताना वीरमाता गंगुबाई यांनी डोळ्यांवर पदर ओढत अश्रू लपविण्याचा प्रयत्न केला.- शब्दांकन - विनोद गोळे
शूरा आम्ही वंदिले : लाविले लग्न युध्दभूमिशी, विलास दिघे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 11:07 AM
सैन्यात भरती झाल्यानंतर मोठ्या धामधुमीत मुलाचे लग्न करायचे, असा विचार करून आई-वडिलांनी मुलगी पाहिली. त्या मुलीबरोबर विलास दिघे यांचे लग्नही ठरवले. पण विलास दिघे यांनी नम्रपणे अगोदर देशसेवा आणि नंतर लग्न असे आई-वडिलांना पटवून दिले. त्याच साली जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी विलास दिघे यांनी निकराचा लढा दिला.
ठळक मुद्देशिपाई विलास दिघेजन्मतारीख १० जून १९७५सैन्यभरती २६ अॉगस्ट १९९३वीरगती १३ डिसेंबर १९९६सैन्यसेवा ३ वर्षेवीरमाता गंगुबाई गणपत दिघे