पाकिस्तानमधून काश्मीरमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांशी प्रमोद यांनी झुंज दिली. दोघांना जागेवरच कंठस्नान घातले. अतिरेक्यांच्या गोळ््या स्वत:च्या छातीवर झेलल्या. अतिरेक्यांशी झुंजताना त्यांना वीरमरण आले. जे देशासाठी लढले... ते अमर हुतात्मा झाले..! असा हा वीर मेंगलवाडीसाठीच नव्हे तर अवघ्या देशासाठी भूषण ठरला.समाजातील अनेक कुटुंब पिढ्यान् पिढ्या एकाच प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करतात. देशसेवेचे महान व्रत स्वीकारणाऱ्या घराण्यात देखील मातृभूमिची सेवा निष्ठेने पिढ्यानपिढ्या केली जाते. प्रसंगी देशासाठी प्राणांची आहुतीही दिली जाते. देशसेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील मुलांना देशसेवेचे बाळकडू दिले जाते. श्रीगोंदा तालुक्यातील मेंगलवाडी (राजापूर) येथील शहीद कै. प्रमोद शिवाजी वीर यांनी अशीच राष्ट्रभक्ती जोपासली आणि वीरयोध्दा म्हणून लौकिक मिळविला.शिवाजी महादेव वीर व सुमनबाई यांचा सुखी संसार सुरू होता. वडील शिवाजी वीर यांनी लष्करात १५ वर्षे निष्ठेने देशसेवा केली. त्यांनी अनेक सन्मान मिळवले. जवान शिवाजी व सुमनबाई यांच्या पोटी १४ डिसेंबर १९८२ रोजी प्रमोदच्या रूपाने ‘नररत्न’ जन्मले. भारतमातेच्या सेवेसाठी अजून एक पुत्र झाल्याने कुटुंबाचा आनंद गगनात मावेना. शिवाजी वीर हे सैन्यदलातून निवृत्त होऊन महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले.प्रमोदचे प्राथमिक शिक्षण श्रीरामपूरमधील नवीन मराठी शाळेत, माध्यमिक शिक्षण नगरला तर उच्च शिक्षण न्यू आर्टस् महाविद्यालयात झाले. वडिलांच्या सहवासामुळे प्रमोदनेही देशसेवा हेच आयुष्याचे ध्येय ठरविले होते. त्यासाठी शरीरयष्टीचा खानदानी वारसा लाभला होता. सोलापूर येथे २५ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या भरतीत त्यांची निवड झाली. मुलगा भरती झाल्याचे कळताच वडिलांची छाती गर्वाने फुलली. आईच्या डोळ्यात आसू आणि चेहºयावर हसू होते.बी. जी. सेंटर पुणे येथून प्रमोद यांचे ९ महिन्यांचे खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण करून भारतमातेचा ‘सच्चा शिलेदार’ बनून सुटीसाठी गावी परतले. शिवाजी वीर यांचा मोठा मुलगा शहाजी हे शेती करतात. प्रमोद हे लहान असल्याने व लष्करात भरती झाल्यामुळे घरच्या मंडळींच्या जीवाला घोर लागला होता.सुट्टी संपल्यानंतर प्रमोद यांचे पोस्टींग ‘११८ रेजिमेंट आसाम’ या ठिकाणी झाले. तेथे काही वर्ष सेवा केल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स तुकडीत जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात बदली झाली. जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशच्या सीमेवर हा जिल्हा आहे. या भागात उंच गवत, बर्फाळ प्रदेश व बाराही महिने वाहणाºया नद्या होत्या. प्रमोद यांना या भागाची भौगोलिक माहिती देण्यात आली. त्यांनी या भागाची पाहणी करून सर्व परिस्थिती आत्मसात केली.या भागात पाकिस्तानी सैनिक घुसखोरांना, अतिरेक्यांना पाठवून निष्पाप लोकांचे बळी घेत. काश्मिरी जनतेला भारतीय सैन्याविरुद्ध भडकविण्याचे काम करीत होते. अशा नापाक लोकांना धडा शिकविण्यासाठी भारतीय लष्कराने ‘आॅपरेशन रक्षक’ हाती घेतले. यामध्ये प्रमोद यांचाही सहभाग होता. या प्रदेशात उंचच उंच पहाड, घनदाट जंगले, भरपूर थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतमातेचे सुपुत्र रक्षणासाठी सज्ज होते. दहशत व दहशतवाद संपुष्टात आणणे हे ‘आॅपरेशन रक्षक’ चे मुख्य लक्ष्य होते. डिसेंबर २००६ मध्ये प्रमोद गावी सुट्टीवर आले होते. दुर्दैवाने ही त्यांची शेवटचीच सुट्टी ठरली. यावेळी त्यांचे वय २४ वर्ष होते. आई-वडिलांनी लग्नाचा विषय काढला. ‘मी आताच भारतमातेच्या सेवेत दाखल झालो आहे. यावर्षी लग्नाचा विषय नको. पुढील सुट्टीत आलो की मग पाहू..’ असे म्हणत विषय टाळला. १५ दिवसांची सुट्टी संपून ते पुन्हा ‘डोडा’ येथे परतले.यावेळी डोडा भागात अतिरेकी दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला. त्यामुळे आॅपरेशन रक्षकमधील जवानांनी मोठ्या शिताफीने शोधमोहीम हाती घेतली. घनदाट अरण्यात लढण्यासाठी अतिरेक्यांनी खंदक खोदले होते. त्यातच ते लपायचे. प्रमोदसह १५ जवान हातात बंदूक घेऊन उंच वाढलेल्या गवतातून वाट काढत शोध घेत होते. इतक्यात उंचावर असणाºया झाडांमध्ये हालचाल झाल्याचा आवाज प्रमोद यांच्या कानावर पडला. चाणाक्ष नजरेने ही हालचाल प्रमोदने अचूक टिपली. अन् आपल्या जवळील मशिनगनचा चाप ओढत विजेच्या गतीने झाडाच्या पाल्यात गोळीबार करून दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अतिरेक्यांपैकी एकाचा श्वास अजूनही चालू होता हे पाहून रागाने संतापलेल्या प्रमोद यांनी दोन गोळ्या त्याच्या डोक्यात घातल्या. त्यामुळे इतर जवान सावध झाले होते. आजूबाजूला त्यांची नजर भिरभिरत होती आणि अचानक खंदकात लपलेल्या अतिरेक्यांनी प्रतिहल्ला केला. सर्वात पुढे असणारे प्रमोद यांना चार गोळ्या लागल्या. त्यातच ते शहीद झाले. क्षणभर निरव शांतता पसरली. हा शूरवीर भारतमातेचा सुपुत्र भारतभूमिच्या कुशीत विसावला. तो दिवस होता २८ जानेवारी २००७ चा.प्रमोद शहीद झाल्याचा निरोप परिसरात कळताच कुणाचाही विश्वास बसेना. सर्व जण शोकसागरात बुडाले. कुटुंबावर तर दु:खाचा डोंगरच कोसळला. दोन दिवसांनी तिरंग्यात लपेटलेले पार्थिव गावी आले. प्रमोद यांना अखेरचा निरोप देण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जमला. लष्करी इतमामात बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. आईच्या आरोळीने वातावरण सुन्न झाले. जळणाºया चितेमध्ये आई-वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नांची होळी झाली होती.शब्दांकन -संदीप घावटे, देवदैठण.
शूरा आम्ही वंदिले : सोडूनी घरदार...झुंजला वीर!, प्रमोद वीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:52 PM
पाकिस्तानमधून काश्मीरमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांशी प्रमोद यांनी झुंज दिली. दोघांना जागेवरच कंठस्नान घातले. अतिरेक्यांच्या गोळ््या स्वत:च्या छातीवर झेलल्या.
ठळक मुद्देजन्म १४ डिसेंबर १९८२सैन्यभरती २५ सप्टेंबर २००१वीरगती २८ जानेवारी २००७सेवा ६ वर्षेवीरमाता सुमनबाई वीर