नेवासा : भेंडा (ता.नेवासा) येथील गोळीबार हा बनाव असल्याचे नेवासा पोलिसांनी तपासातून उघड केले आहे. फिर्यादीच्या मित्रांनी हा बनाव केला असून यातील दहा जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. मुलीच्या कारणावरून झालेल्या जुन्या वादातून दोघांना अडकविण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे समाेर आले आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व गावठी कट्टा जप्त केला आहे.
शनिवारी (दि.१) रात्री भेंडा येथे व्हॉलीबॉल मैदानात सोमनाथ तांबे या युवकावर गावठ्ठी कट्ट्यातून गोळीबार केला होता. त्यात तो जखमी झाला होता. फिर्यादीत दोघांचा संशयित म्हणून उल्लेख आल्याने पोलीस निरीक्षक विजय करे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. मुलीच्या प्रकरणातून सोमनाथ तांबे याच्यावर गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार तपासातून समोर आला. त्यांनी तपासासाठी ५० हून अधिक साक्षीदार तपासले. या गुन्ह्यातील पाच आरोपी व गोळीबार प्रकरणात गुन्हेगारांना आश्रय देणारे पाच अशा एकूण दहा जणांना पोलिसांनी गजाआड केले.
पोलीस निरीक्षक करे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर व पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तपासासाठी रवाना केले. शहरटाकळी येथून गोळीबार प्रकरणात गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांना तर शिरूर कासार येथील लॉजवरून आरोपींना पोलिसांनी अटक केली.
अमोल अशोक गडाख, अक्षय रामदास चेमटे, अमोल राजेंद्र शेजवळ, शुभम विश्वनाथ गर्जे, स्वप्नील बाबासाहेब बोधक,
ओंकार राजेंद्र काकडे, प्रसाद शिवाजी दळवी, अक्षय संजय हाफशेटे, शुभम किशोर जोशी, सचिन साहेबराव काते यांना पोलिसांनी अटक केली. यातील अक्षय चेमटे याने मुलीच्या कारणावरून सोमनाथ याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याचे पोलीस निरीक्षक करे यांनी सांगितले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस नाईक राहुल यादव, पोलीस नाईक महेश कचे, सुहास गायकवाड, वसीम इनामदार, श्याम गुंजाळ, गणेश इथापे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
--
चोर समजून पोलिसांवरच दगडफेक
गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या शोधात पोलीस पथक शिरूर कासार येथील एका लॉजवर गेले असता पहाटेची वेळ असल्याने चोर समजून येथील कर्मचाऱ्यांनी पोलिसांवरच दगडफेक केल्याची घटना घडली.
--
आरोपी अमोल शेजवळ, अमोल गडाख (दोघे रा.सोनई) व अक्षय चेमटे (रा. घोडेगाव) यांनी शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याची कबुली दिल्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सांगितले.