केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवत आहे. तत्काळ लसीचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी माजी उपसरपंच बंडू पवार यांनी केली आहे.
जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १६ गावे येत असून ५० हजारांच्यावर लोकसंख्या आहे. त्यामध्ये सर्वात जास्त १५ हजार लोकसंख्या जेऊर गावची आहे. त्यामुळे जेऊरसाठी लसीचा पुरवठा जास्त प्रमाणात होणे गरजेचे आहे.
आरोग्य केंद्रांतर्गत छोट्या छोट्या गावांनी लसीकरणाचे कॅम्प घेण्यात येत आहेत. ही बाब चांगली असली तरी जेऊरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जेऊर आरोग्य केंद्रात दररोज सकाळी वाड्या वस्त्यांवरुन लोक लसीकरणासाठी येत आहेत. परंतु, लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागत आहेत.
तरी लसीचे वितरण लोकसंख्येनुसार करण्यात यावे. अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बंडू पवार यांनी केला आहे.
--
जेऊर आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहेत. परंतु, लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरणासाठी अडचण निर्माण होत आहेत. लस उपलब्ध झाल्यानंतर प्रत्येक गावात कॅम्प घेऊन लसीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये. लस उपलब्ध झाल्यास जास्त वेळ काम करून लसीकरण करण्यात येईल.
-डॉ. योगेश कर्डिले,
वैद्यकीय अधिकारी, जेऊर आरोग्य केंद्र
--
पोलीस बंदोबस्ताची मागणी
जेऊर आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी तसेच कोरोना तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून अनेक नागरिक आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांशी अरेरावी करत आहेत. हा प्रकार नित्याचाच झाला असून लसीकरणासाठी पोलीस बंदोबस्त मिळण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.