लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : शहरासह तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून रॅपिड अँटिजन किटचा पुरवठा होत नसल्याने मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सोमवारी (दि. २६) कोपरगाव तालुक्यात वारी व संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्र वगळता, ग्रामीण रुग्णालयासह इतर प्राथमिक आरोग्य केंद्रावर तपासण्याच न झाल्याने शेकडो नागिरकांना आल्या पावली परत जावे लागले. त्यामुळे कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या कोपरगाव तालुक्याला रॅपिड किट मिळणार कधी, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
कोपरगाव शहरासह तालुक्यात गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोपरगाव शहरासह तालुक्यातील आरोग्य यंत्रणा रॅपिड अँटिजन किटद्वारे दररोज शकडो व्यक्तींची तपासणी करून त्यातील बाधित रुग्णांचे तत्काळ विलगीकरण करीत आहेत. त्यामुळे बाधितांपासून इतरांना होणाऱ्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यास सोपे होऊ लागले आहे, परंतु चार दिवसांपासून पुरवठाच झालेला नाही. रविवारी ग्रामीण रुग्णालयास फक्त १०० किटचा पुरवठा झाला. त्यामुळे आता किट संपल्याने तपासणीच होत नाही. त्यामुळे कोपरगावसाठी या तपासणी किट मिळणार की नाही, असाच प्रश्न उपस्थित झाला आहे.
...........
पालकमंत्र्यांची भेट निष्फळ!
आमदार आशुतोष काळे यांनी चार दिवसांपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची मुबंई येथे भेट घेऊन कोपरगावला तपासणीसाठी लागणाऱ्या किटची कमतरता पडू देऊ नका, या संदर्भात मागणी केली होती. मात्र, तरीही अद्यापपर्यंत किट उपलब्ध न झाल्याने ही भेटही निष्फळ ठरली, असेच म्हणावे लागेल.
........
सोमवारी रेपिड किटद्वारे झाल्या ६१ तपासण्या
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र - ०४
पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र - ००
टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्र - ००
दहीगाव बोलका प्राथमिक आरोग्य केंद्र - ००
चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्र - ००
वारी प्राथमिक आरोग्य केंद्र - १५
संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्र - ४२
.........
‘चार दिवसांपासून रॅपिड अँटिजन किट संपलेल्या आहेत. मागणी केलेली आहे. मात्र, अद्यापपर्यंत पुरवठा झालेला नाही. सोमवारी फक्त दोनच प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्याकडे किट शिल्लक असल्याने तपासणी झाली. त्यामुळे लवकरात किटचा पुरवठा होऊन तपासण्या होणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रसार वाढणार नाही.
- डॉ. वैशाली बडदे, विशेष वैद्यकिय अधिकारी, कोपरगाव .
............
" कोपरगाव तालुक्याची कोरोनाची परिस्थिती पाहता शासनाकडून मिळणाऱ्या सेवासुविधांसाठी प्रसंगी कठोर भूमिका घेऊन ती मदत आरोग्य यंत्रणेला उपलब्ध करून देणे गरजेचे आहे; परंतु तसे होत नाही. त्याहूनही पुढे जाऊन निव्वळ शासनाच्या भरवशावर न राहाता सामाजिक दायित्व म्हणून तालुक्याच्या दोन्ही शक्तींनी राजकारण विसरून एकत्र येत सर्व उपलब्ध करणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही देखील पुढे येऊन मदत करण्यास तयार आहोत. मात्र, तसे न होता ही मंडळीकडून फक्त वेळ काढण्याचे काम होत असून यात कोपरगावची निरपराध जनता भरडली जात आहे.
- राजेश परजणे, जिल्हा परिषद सदस्य, कोपरगाव