टाकळी ढोकेश्वर : अहमदनगर जिल्ह्याचे हक्काचे पाणी व वीज पुणे जिल्ह्याचे पुढारी पळवीत असून, पुण्याच्या पुढाऱ्यांच्या विरोधात बंड करण्याची क्षमता असेल तर पाणी व वीज प्रश्नावर बोलावे. पाणी प्रश्नाबाबत पुणे विरुद्ध नगर असा संघर्ष असून, पारनेरच्या लोकप्रतिनिधीने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून हिंमत दाखवावी, अशी अप्रत्यक्ष टीका भाजपचे खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्यावर केली.
पाणी प्रश्नाची लढाई शेतकऱ्यांसाठी असून, यावर पक्षीय राजकारण न करता जनतेच्या भावनांशी खेळू नये. ही शेतकऱ्यांची लढाई असून, पाण्याचा संघर्ष हा पुणे जिल्ह्याच्या विरोधात आहे. पिंपळगाव जोगा धरणाच्या आवर्तनाबाबत पुणे जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी पाण्याचा एक थेंब जाऊ देणार नाही असे जाहीर भाष्य करतात. त्यावर पारनेरचे लोकप्रतिनिधी बोलत नाहीत, असा सवालही विखे यांनी केला आहे.
पिंपळगाव जोगा धरणातून शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही म्हणून काही शेतकरी माझ्याकडे आले. शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न महत्त्वाचा असून, तो प्राणी प्रश्न सोडविण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. पिंपळगाव जोगा धरणातून अळकुटीसह इतर आठ ते नऊ गावातील शेतकऱ्यांना पाणी दिले जाते. त्या सर्व गावातील कालव्याला निरीक्षक नाहीत. मी कोणावर अवलंबून नसून पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न माझ्या हिमतीवर सोडविणार आहे, असेही विखे म्हणाले.