अहमदनगर : जिल्ह्यातील दोन तालुके वगळता सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. काही दिवसात मंदिर, शाळाही उघडणार आहेत. कोरोनाचे निर्बंध सैल झाल्याने इतक्या दिवस घरात बसलेले नागरिक आता घराबाहेर पडत आहेत. नगर जिल्ह्यातील हॉटेलमध्ये आता गर्दी वाढू लागली आहे. गेल्या वर्षभरापासून आर्थिक चिंतेत असलेल्या हॉटेल व्यवसायाला चालना मिळाली आहे.
कोरोना कमी झाला तरी श्रावण मास, गणेशोत्सवामुळे अनेक लोक हॉटेलमध्ये जाणे टाळत होते. या काळात अनेकजण मांसाहारही वर्ज्य करतात. त्यामुळे हॉटेल व्यवसाय थोडा मंदच होता. आता श्रावण संपला आहे. गणपती बाप्पाही गेले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय चांगलाच बहरला आहे. नगर शहरातील सर्वच शाकाहारी, मांसाहारी हॉटेलमध्येही गर्दी होत आहे. याशिवाय औरंगाबाद, पुणे, मनमाड, सोलापूर, कल्याण महामार्गावरील ढाब्यांवरही खवय्यांची गर्दी वाढत आहे. ऑगस्टनंतर हळूहळू व्यवसाय पूर्वपदावर आला आहे. बहुतांश लोक आता सहकुटुंब हॉटेलमध्ये जेवायला जात आहेत. नगर शहरातही शनिवार, रविवारी सर्वच हॉटेल हाऊसफुल्ल होते.
----------
ई- मेन्यू कार्डची सुविधा
कोरोनामुळे दक्षता म्हणून बहुतांश हॉटेलमध्ये ई-मेन्यू कार्ड आणि ई-पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, अशा पद्धतीने हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेलच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर स्टँडही ठेवले आहे. तसेच काही खवय्यांसाठी पार्सल सुविधाही सुरू आहे.
----------------
मंदिर उघडल्यानंतर हॉटेल व्यवसाय आणखी वाढणार
सध्या मंदिरे बंद आहेत. राज्य सरकारने ७ ऑक्टोबरपासून मंदिरे उघडण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिर्डी, शिंगणापूर, मढी, मोहटा, देवगड, वृद्धेश्वर आदी देवस्थान परिसरातील हॉटेल व्यवसाय फुलणार आहे. याशिवाय पाऊस चांगला झाल्याने पर्यटनस्थळांवरही गर्दी होत असल्याने परिसरातील हॉटेलमध्येही गर्दी आहे. तसेच चित्रपटगृहेही सुरू होणार असल्याने या परिसरातील हॉटेलला बरकत येणार आहे.
-----------------
हॉटेलची संख्या-४५९९
हॉटेल कामगार-५७५८
चित्रपटगृहे-५९
----------------
लसीकरणाचे प्रमाण चांगले असल्याने लोकांच्या मनातील भीती आता गेली आहे. त्यात आता मंदिरे उघडणार असल्याने जिल्ह्यात येणाऱ्यांचे प्रमाण वाढेल. ७० ते ८० टक्के हॉटेल व्यवसाय पूर्वपदावर आला आहे.
-सुनील काळे, हॉटेल व्यावसायिक
----------
आता हॉटेल व्यवसाय पूर्वपदावर आला आहे. ग्राहक हॉटेलमध्ये खाण्यास पसंती देत आहेत. लसीकरण चांगले झाले असल्याने लोक सहकुटुंब भोजनासाठी हॉटेलमध्ये येत आहेत. नवीन ग्राहकांमुळे हॉटेलमध्ये गर्दी होत आहे. सामाजिक अंतराचे पालन करूनच ग्राहकांची सोय केली आहे.
-अवधूत फुलसौंदर, हॉटेल व्यावसायिक
---------------
फाईल फोटो