संगमनेर : संगमनेर शहरातील हनुमान जन्मोत्सवाला आगळं-वेगळं महत्त्व आहे. या दिवशी चंद्रशेखर चौकातील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरापासून श्री हनुमान विजयरथ निघतो. भव्य असा विजयरथ १९२९ पासून ओढण्याचा मान महिलांना आहे. ब्रिटीशकाळापासून असलेली ही परंपरा संगमनेरकर जोपासत आहेत. गुरुवारी (दि.६) हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरी करण्यात येतो आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिरवणुकीने आणलेला केशरी ध्वज रथावर लावल्यानंतर रथोत्सवाला सुरुवात झाली. यंदाही शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी परंपरेप्रमाणे चंद्रशेखर चौकापर्यंत रथ ओढला.
असा आहे ‘विजयरथोत्सवा’चा इतिहास
रथोत्सवावर १९२७ ते १९२९ अशी सलग तीन वर्षे ब्रिटीशांनी बंदी घातली होती. बंदीचा विरोध झुगारून १९२७ साली ब्रिटीशांनी अडविलेल्या रथाची पाच दिवसांनंतर व १९२८ साली दोन महिने पूजा केल्यानंतर हा रथ पुढे नेण्यात आला. २३ एप्रिल १९२९ साली हनुमान जन्ममोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आदल्या दिवशी रथोत्सवावर बंदी घालण्यात आली. जन्मोत्सवाच्या पहाटे मंदिर परिसरासह मिरवणूक मार्गावर सुमारे पाचशे पोलिसांचा गराडा पडला. पहाटे मंदिरातील धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रथात दोन लहान मुलींनी हनुमानाची छोटी मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना अडवत ती मूर्ती पुन्हा मंदिरात नेऊन ठेवली. पोलीस मिरवणुकीस करत असलेला विरोध पाहून अनेकजण घरी गेले. अचानक एवढ्यात दोनशे-अडीचशे महिलांनी एकत्र येऊन रथाचा ताबा घेतला. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच मंदिर परिसरात महिलांची संख्या वाढली.
पोलिसांनी त्यांच्याशी अनेक युक्तिवाद केले, भीती दाखविली, अटक करण्याची-खटले भरण्याची धमकीही दिली. परंतु आदिशक्तीचे रूप धारण केलेल्या महिलांनी रथ पुढे नेण्याचा निर्धार केला. पोलिसांनी काही तरुणांना बेड्या घालून अटकेचा प्रयत्न केला व याच गडबडीचा फायदा घेत झुंबरबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे व इतर महिलांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा ठेऊन ‘बलभीम हनुमान की जय’असा गजर करीत रथाचा दोर ओढून तो पुढे नेला. तेव्हापासून प्रथम हा रथ ओढण्याचा मान महिलांना आहे. पोलिसांनी मिरवणुकीने आणलेला केशरी ध्वज रथावर लावल्यानंतर त्यांच्या हस्ते मारूतीरायाच्या उत्सव मूर्तीची पूजा होऊन रथोत्सवाला सुरुवात होते.