अहमदनगर : जिल्ह्यातील १४ पंचायत समितींच्या सभापतीपदाची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत आज सकाळी नियोजन भवनात ही सोडत काढण्यात आली. यामध्ये श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जातीसाठी, तर जामखेडचे सभापतीपद अनूसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे.
आज जाहीर झालेले आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. अनुसूचित जाती- श्रीगोंदा, अनुसूचित जमाती- जामखेड, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)-अकोले, पाथर्डी, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)- राहुरी, श्रीरामपूर, सर्वसाधारण-पारनेर,नेवासा, शेवगाव, सर्वसाधारण महिला-संगमनेर, राहाता, नगर, कर्जत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीचेही राजकारण जिल्ह्यात तापणार आहे. सध्या सहा ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तर सहा ठिकाणी शिवसेना-भाजपचे सभापती आहेत. लोकसेवा मंडळ आणि क्रांतीकारीचा प्रत्येकी एक ठिकाणी सभापती आहे. राज्यात सध्या तिसºया आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणही फिरणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस एकत्र झाले तर जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील सत्ता बदलण्याची शक्यता आहे.जामखेडचा तिढाजामखेड पंचायत समिती सभापतीपदासाठी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण पडले आहे. मात्र तिथे एकही गण अनूसूचित जमातीसाठी राखीव नसल्याने या पंचायत समितीच्या सभापतीपदाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सदरचे आरक्षण बदलण्यासाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.