श्रीगोंदा : गॅप पाईप लाईनच्या ठेकेदाराला खंडणी मागितल्याच्या आरोपामुळे श्रीगोंदा तालुका शिवसेनेतील तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे व ज्येष्ठ नेते नंदकुमार ताडे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
श्रीगोंदा तालुका शिवसेना प्रमुख बाळासाहेब दुतारे यांनी शहरात सुरू असलेल्या भारत गॅस पाईप लाईन प्रकल्पाच्या तक्रारी करून ठेकेदाराला दमबाजी करून खंडणी मागितली आहे. ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यातून शिवसेनेची बदनामी झाली. त्यामुळे अशा तालुका प्रमुखाची उचलबांगडी करा, अशी मागणी सेनेचे ज्येष्ठ नेते नंदकुमार ताडे यांनी केली आहे.
श्रीगोंदा येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ताडे म्हणाले, गेल्या २०-३० वर्षांत शिवसैनिकांनी उपाशी-तापाशी राहून काम केले. सेना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. दुतारे यांनी खंडणी मागितल्याने शिवसेनेच्या प्रतिमेला तडा गेला आहे. अशा परिस्थितीत दुतारे हे माफी मागण्याऐवजी मी सेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब गोरेगावकर यांना पाच लाख दिले. मला कोणी हलवू शकत नाही, असे म्हणतात. ही दुर्दैवी बाब आहे, असेही ताडे म्हणाले.
यावेळी तालुका उपप्रमुख संतोष शिंदे, तालुका संघटक नाथाभाऊ पवार, मयूर चव्हाण, दादासाहेब ढगे, अनिल हिरडे, समीर काझी, शिवराज ताडे, ऋषिकेश खरात, चोराचीवाडीचे उपसरपंच दादा चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश घोलवड, महादेव शेळके, बाळासाहेब जगदाळे, सुरेश सोले, उमेश वेताळ, मच्छिंद्र गाढवे, रमेश चोर उपस्थित होते
.........
सेनेचे कुंकू लावून विरोधकांना मदत कोण करते?
गॅस पाईप लाईनचा ठेकेदार चोरून वीज वापरत होता. मी ही चोरी पकडून दिली. त्यामुळे त्याला एक लाखाचा दंड महावितरण कंपनीने केला. नंदकुमार ताडे यांना पक्षात कोणी विचारत नाही. त्यामुळे माझी क्लिप व्हायरल केली. ही क्लिप जिल्हा सेना प्रमुख यांना तीन महिन्यांपूर्वीच दिली आहे. सेनेचे काम निष्ठेने केल्यानेच तालुका प्रमुखपद श्रेष्ठींनी दिले. काहीतरी कुरापती काढून मला आणि सेनेला बदनाम करण्याचा उद्योग काही जणांकडून सुरू आहे. मात्र सेनेचे कुंकू लावून विरोधकांना मदत कोण करते हे सर्वांना माहीत आहे, अशी टीका सेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे यांनी केली.