shrigonda Assembly Election 2024 Result Live Updates : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती समोर येत आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी आघाडी घेतली आहे. याठिकाणी भाजपचे विक्रम पाचपुते आणि माजी आमदार राहुल जगताप यांची तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घनश्याम शेलार यांचा निसटता पराभव केला होता.
भाजपने यावेळी पाचपुते यांचा मुलगा विक्रम पाचपुते यांना तिकीट दिलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या अनुराधा नागवडे यांनी निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात प्रवेश करुन तिकीट मिळवलं होतं. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार राहुल जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ पाचपुतेंचा गडश्रीगोंदा मतदारसंघात मध्ये काही वर्षांचा अपवाद सोडला तर तब्बल सातवेळा भाजपचे माजी आमदार बबनराव पाचपुते येथून आमदार म्हणून निवडले गेले आहेत. पाचपुते यांनी विविध पक्षांतर्फे येथून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांचा मतदार त्यांना सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या सून अनुराधा नागवडे यावेळी पहिल्यांदाच आमदारकी लढवत आहेत. नागवडे साखर कारखाना आणि तालुक्यातील राजकारणात असलेलं प्रस्थ यामुळे ही निवडणूक तुल्यबळ मानली जात आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्याचा गड कोण राखणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
विधानसभेच्या २८८ मतदारसंघाचं चित्र होणार स्पष्ट अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यात सत्ता बदल होणार की पुन्हा महायुतीचं सरकार येणार? हे आज स्पष्ट होईल. २८८ विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडलं. यावेळी २८८ मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी राज्यात सर्वाधिक ६६ टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूने असणार हे पाहण्याचं ठरणार आहे.