श्रीगोंदा : चंद्रपूर येथे रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेली महापौर कुस्ती चषक स्पर्धा श्रीगोंद्याच्या फंड भगिनींनी गाजविली. भाग्यश्री फंडने महापौर चषक जिंकला तर धनश्री फंडने गटात सुवर्णपदक पटकावले.अंतिम लढतीत भाग्यश्रीने कोल्हापूरच्या अंकीता शिंदे हिच्यावर १० विरूद्ध ० गुणांनी मात करत महापौर चषक जिंकला. भाग्यश्रीचा महापौर अंजली घाटेकर व महानगरपालिका आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते ५१ हजार रुपये रोख व दोन किलो वजनाची चांदीची गदा देऊन सन्मान करण्यात आला. भाग्यश्रीची बहिण धनश्री फंडने वजनगटात सुवर्णपदक जिंकले.भाग्यश्रीने पहिल्या फेरीत चंद्रपूरच्या नेहा बोरूडेला १० विरूद्ध ० गुणांनी पराजित केले. दुसऱ्या फेरीत कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय पैलवान स्वाती शिंदे हिचा १० विरूद्ध ० गुणांनी पराभव करून महापौर चषक जिंकण्याकडे वाटचाल केली. तिस-या फेरीत कोल्हापूरची राष्ट्रीय पदक विजेती प्रतिक्षा देबाजे हीचा पराभव करुन भाग्यश्रीने अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम लढतीत कोल्हापूरची राष्ट्रीय मल्ल अंकिता शिंदेला पराभुत करून भाग्यश्रीने महापौर चषकावर नाव कोरले.धनश्री फंड हिने आपल्या गटातील सर्व कुस्ती सामने विरुद्ध मल्लाला एकही गुण न देता १० विरूद्ध ० गुणांच्या फरकाने जिंकल्या.
रेल्वेस्टेशनवर सेल्फीसाठी झुंबड
भाग्यश्री व धनश्री फंड चांदीची गदा घेऊन चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर आल्या. रेल्वेत बसण्यापूर्वी फंड भगिनींबरोबर सेल्फी काढण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडाली. अखेर रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रवाशांना दूर केले आणि फंड भगिनींना रेल्वेत बसवून दिले. यावेळी फंड भगिनींच्या वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरारळले.