श्रीगोंदा- रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी तालुक्यावर मेहरनजर दाखविली आहे. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल बॉडी सदस्यपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस व महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम कन्हेरकर यांची वर्णी लागली आहे. गेल्या वर्षी भाजपाचे नेते आमदार बबनराव पाचपुते यांना संधी दिली होती.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व आ. बबनराव पाचपुते यांना ब्रेक दिला आहे. त्यांच्या जागी बाबासाहेब भोस व दादाभाऊ कळमकर यांना संधी देण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागातील सेवकांमधून तुकाराम कन्हेरकर यांना संधी देण्यात आली. या निवडीने श्रीगोंदा तालुक्यात दोघांना संधी मिळाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बबनराव पाचपुते यांचे सर्व जनरल बॉडीचे सदस्य कायम ठेवण्यात आले आहेत. -- पवारांमुळे संधी रयत शिक्षण संस्थेत आपण गेल्या चाळीस वषार्पासून काम करीत आहोत. मॅनेजिंग कौन्सिल बॉडीवर रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे काम करण्याची संधी मिळाली आहे. रयत शिक्षण संस्थेतील विद्यामंदिरांचा विकास आणि सेवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लक्ष देणार आहे. -बाबासाहेब भोस, सदस्य मॅनेजिंग कौन्सिल बॉडी, रयत शिक्षण संस्था