अहमदनगर: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपाचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला पोलीस प्रशासनाने पंधरा दिवसांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. छिंदमच्या तडीपारीचा सोमवारी आदेश काढण्यात आला असून, १६ एप्रिलपर्यंत त्याला जिल्हाबंदी करण्यात आली आहे.छिंदमला राज्यातून तडीपार करण्याच्या मागणीसाठी शिवप्रेमींच्यावतीने मंगळवारी (दि़३) शहरातून शिवसन्मान मोर्चा काढण्यात येणार आहे. छिंदम या विषयावरून शहरात पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी छिंदमला पोलीस प्रशासनाने १५ दिवसांसासठी जिल्हा बंदी केली आहे.दरम्यान छिंदम याने १६ फेबु्रवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची अॅडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छिंदम याचे दिल्ली गेट परिसरातील कार्यालय व त्याच्या घरासमोर लावलेल्या मोटारसायकलची तोडफोड केली होती. या तोडफोडप्रकरणी छिंदम याने रविवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून पोलीसांनी राजेंद्र नारायण दांगट, योगेश देशमुख, स्वप्निल दगडे, गोरख दळवी, भावड्या अनभुले, चेतन शेलार, विरेश तवले, रोहित गुंजाळ, धनंजय लोकरे, बाबासाहेब रोहकले, धनवान दिघे, हरिष भांबरे, गिरीष भांबरे यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.छिंदम याने दाखल केलीली फिर्याद व मंगळवारी त्याच्या तडीपारीच्या मागणीसाठी निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने छिंदमला जिल्हा बंदी केली असून, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरिक्षक सुरेश सपकाळे यांनी तडीपारीबाबत छिंदम याला नोटीस बाजवली आहे.
श्रीपाद छिंदम नगर जिल्ह्यातून तडीपार, छिंदमने दिली २५ जणांविरोधात फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 2:26 PM